बाळनाथ वडस्कर यांच्यासाठी सात महिला सदस्यांनी नाकारले सरपंचपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:27 AM2021-02-13T04:27:26+5:302021-02-13T04:27:26+5:30

सास्ती(चंद्रपूर) : चुनाळा येथे शुक्रवारी सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक आगळीवेगळी ठरली. सरपंचपद महिलांकरिता आरक्षित होते. मात्र गावकऱ्यांना या पदावर ...

Seven women members reject Sarpanch post for Balnath Vadaskar | बाळनाथ वडस्कर यांच्यासाठी सात महिला सदस्यांनी नाकारले सरपंचपद

बाळनाथ वडस्कर यांच्यासाठी सात महिला सदस्यांनी नाकारले सरपंचपद

Next

सास्ती(चंद्रपूर) : चुनाळा येथे शुक्रवारी सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक आगळीवेगळी ठरली. सरपंचपद महिलांकरिता आरक्षित होते. मात्र गावकऱ्यांना या पदावर पुन्हा माजी सरपंच बाळनाथ वडस्कर यांनाच बसवायचे होते. नवनिर्वाचित महिला सदस्यांनाही हेच अपेक्षित होते. एकूण १३ पैकी सात महिला सदस्य दावेदार असताना एकीनेही सरपंच पदाकरिता नामांकन सादर केले नाही. बाळनाथ वडस्कर यांनी उपसरंपदासाठी नामांकन दाखल केले आणि ते अविरोध निवडून आले. सरपंचपद रिक्त राहिले. यामुळे आपोआपच सरपंच पदाचाही कारभार वडस्कर यांच्याकडेच असणार आहे. पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजारचा पॅटर्न राबवून चुनाळा वासीयांनी चंद्रपूर जिल्ह्यात नवा आदर्श ठेवला.

राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतीची निवडणूक माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बाळनाथ वडस्कर यांच्या नेतृत्वात लढविली. जनतेने या आघाडीला एकतर्फी कौल देत सर्व १३ उमेदवार निवडून दिले. यानंतर आम्हाला बाळनाथ वडस्कर हेच सरपंचपदी पाहिजे, असा आग्रहही धरला. मात्र सरपंचपदाचे आरक्षण हे महिलांसाठी निघाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. सुमारे पाचशे महिला-पुरुषांनी तहसीलवर धडक देत सरपंच पदाचे आरक्षण बदलवून देण्याची मागणी केली. परंतु प्रशासनाने हे शक्य नसल्याचे सांगितले. अखेर गावकऱ्यांनी हिवरे बाजार पॅटर्न अमलात आणण्याचा निर्णय घेतला. सरपंचपद आरक्षित असताना एकाही महिला सदस्याने आपले नामांकन दाखल केले नाही. उपसरपंचपदाकरिता माजी सरपंच असलेले नवनिर्वाचित सदस्य बाळनाथ वडस्कर यांनी एकमेव नामांकन दाखल केले आणि ते अविरोध निवडून आले. सरपंचपद रिक्त राहिले. परिणामी गावकऱ्यांच्या इच्छेनुसार सरपंचपदाचा प्रभार उपसरपंच या नात्याने बाळनाथ वडस्कर यांच्याकडेच असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी महेंद्र डाखरे यांनी काम पाहिले.

महिला सदस्यांनी का नाकारले सरपंचपद

ग्रामपंचायतीच्या मालकीचे विश्रामगृह चुनाळा येथे आहे. सात एकर परिसरात साग वृक्ष असून कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. ग्रामपंचायतीचे पहिले सचिवालय उभारले. गावातील सर्व कार्यालये, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, बँक, ग्रामपंचायत याच इमारतीत आहे. स्वतंत्र सभागृह असून सामाजिक कार्यक्रम व खासगी कार्यक्रम करण्यास सोईचे आहे. मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी तीन पाण्याच्या टाक्या आहेत. शेतात जाण्यासाठी पांदण रस्त्यांची सुविधा आहे. या विकास कामांवर विश्वास ठेवून बाळनाथ वडस्कर यांनाच सरपंचपदी विराजमान करण्याचा निर्णय जनतेने घेतला. या निर्णयाची ग्रामपंचायत सदस्य संतोषी निमकर, जया निखाडे, उषा करमणकर, संतोषी साळवे, अर्चना आत्राम, कोमल काटम, वंदना पिदूरकर, दिनकर कोडापे, राजू किनेकर, राकेश कार्लेकर, रवी गायकवाड, सचिन कांबळे यांनी कृतीतून अंमलबजावणी केली.

Web Title: Seven women members reject Sarpanch post for Balnath Vadaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.