जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय सतरा वर्षांचा ‘भुजंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 11:10 PM2021-07-24T23:10:58+5:302021-07-24T23:12:45+5:30
फक्त अर्ध्या पायली दुधावर त्याला त्याची भूक भागवावी लागते. भुजंगचे वय जसे वाढत आहे, तशी त्याची पोटाची भूकही वाढत आहे. गरिबीने लाचार झालेल्या त्याच्या वृद्ध आई-वडिलांना भुजंगचा सांभाळ कसा करायचा, हा मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. पैसे नसल्याने अनेकदा भुजंग उपाशीपोटी झोपत असतो. पण तो आई-वडिलाकडे तक्रार करीत नाही. वृद्ध आई-वडिलाच्या दारिद्र्याकडे बघून हे निमुटपणे सहन करतो.
पी. एस. गोरंतवार
पोंभूर्णा : वरण-भात सोडा साधे बिस्कीटही न खाता कुणी फक्त दुध पिऊन जगू शकतो का.? आश्चर्य आहे ना..! पण हे सत्य आहे. जन्मापासून तर आज वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत तो फक्त दूध आणि दूधच पिऊन जगतो आहे. पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील भुजंग गुरूदास मडावी असे त्याचे नाव आहे. गावकरी त्याला 'आऊ' म्हणतात.
भुजंगचा जन्म २३ ऑगस्ट २००५ ला जामखुर्द येथे अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या कुटुंबात झाला. वडील गुरूदास व आई सुनिता दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. साधारण जन्म झालेला भुजंग मात्र असाधारण अनुभव देत होता. भुजंगचा जन्म झाल्यानंतर तब्बल १२ दिवस त्याने आपले डोळेच उघडलेले नव्हते. शिवाय त्याने आईचे दुधही प्याले नाही. कुटुंबीयांची चिंता वाढली होती.
बरीच खटपट झाली. शेवटी तेराव्या दिवशी भुजंगने आपले डोळे उघडून आईचे दूध पिले. सर्व चिंतामुक्त झाले.
भुजंग सहा महिन्याचा झाल्यानंतर वरण-भात व खिचडी खाऊ घालण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण अन्नाचा एक कणही त्याने तोंडात घेतला नाही. भूक लागली की तो फक्त दुधासाठी किंचाळत असे. हा प्रकार अनेक दिवस चालला. नेमकी काय अडचण आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. उपचार करण्यात आले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अनेक तपासण्या अंती तो फिट आढळून येत होता. त्यामुळे भुजंगची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी पुष्टी केली.
वयाच्या सहा वर्षांपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते. तोपर्यंत त्याने अन्नाचा कणही तोंडात घेतला नाही.
आज भुजंग १७ वर्षांचा आहे.तो अजूनही फक्त दूधच पितो. वरण- भात नाही, बिस्कीट नाही की चाॅकलेट नाही. दुध हाच त्याचा आहार. एक शेर सकाळी एक शेर संध्याकाळी. कधी पैसे असले की दुपारी एक शेर दूधच. बस हाच त्याचा आहार आहे. फक्त अर्ध्या पायली दुधावर त्याला त्याची भूक भागवावी लागते. भुजंगचे वय जसे वाढत आहे, तशी त्याची पोटाची भूकही वाढत आहे. गरिबीने लाचार झालेल्या त्याच्या वृद्ध आई-वडिलांना भुजंगचा सांभाळ कसा करायचा, हा मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. पैसे नसल्याने अनेकदा भुजंग उपाशीपोटी झोपत असतो. पण तो आई-वडिलाकडे तक्रार करीत नाही. वृद्ध आई-वडिलाच्या दारिद्र्याकडे बघून हे निमुटपणे सहन करतो.
अनेकदा झोपावे लागते उपाशीपोटी
आई, वडील मोलमजुरी करतात, मिळेल ते काम करतात. पण गावखेड्यात दररोज काम मिळेल असे नसते. म्हणून पैश्याच्या अभावी अनेकदा भुजंगला दूध मिळत नाही. अनेकदा त्याला रात्री उपाशी पोटीच झोपावे लागले आहे.
शिक्षण म्हणजे वहीवर रेषा ओढणे
भुजंगला शाळेत घातले. इयत्ता पहिली ते सातवीचे शिक्षण जामखुर्द येथेच पूर्ण केले आहे. आठवीपासून तो देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालयात शिक्षण घेत आहे. तो यावर्षी दहावीत आहे. भुजंगचे शिक्षण म्हणजे वहीवर रेषा ओढून घेणे. शिक्षणाचा संपूर्ण सार तो आपल्या रेषांमध्ये शोधतो. मास्तराच्या प्रत्येक शिकवणीत तो ध्यानस्त बसून बघतो. भुजंगला लिहिता, वाचता, बोलता येत नाही. मात्र त्याला बोललेलं सर्व कळते. त्याची जिभ जाड असल्याचे बोलले जाते. तो शाळेला 'बेलम' व पैशाला 'खुणाल' म्हणतो.