पांदण रस्त्याची अनेक प्रकरणे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:30 AM2021-08-23T04:30:35+5:302021-08-23T04:30:35+5:30
रत्नाकर चटप नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील पांदण रस्त्याची अनेक प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून शेकडो प्रकरणांचे प्रस्ताव ...
रत्नाकर चटप
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील पांदण रस्त्याची अनेक प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून शेकडो प्रकरणांचे प्रस्ताव तहसील कार्यालयात धूळखात आहे.
पावसाळ्यात शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून घेण्याकरिता पांदण रस्त्याच्या संदर्भात अनेक ठिकाणी वाद असल्याचे दिसून येते. त्यातून तोडगा काढण्यासाठी शेतकरी तहसील कार्यालयात संबंधित रस्त्याबाबत तक्रारी दाखल करतात. मात्र, महिने उलटूनही प्रशासनामार्फत कुठलाही न्याय देण्यात येत नसल्याने शेती रस्त्याचे वाद अजूनही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यत्वे त्यात तलाठी तथा मंडल अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना भूलथापा देण्यात येत असल्याने कधी एक दिवस आधी तर कधी वेळेवर संबंधित प्रकरणाची चौकशीबाबतची नोटीस शेतकऱ्यांना दिली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडते. वारंवार कार्यालयात भेटी देऊनही वरिष्ठ अधिकारीही याकडे कानाडोळा करत असल्याने बरीच प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांना जाण्यासाठी मार्ग नाही. डोक्यावर शेती साहित्य घेऊन शेतात जावे लागत आहे तर अनेक गावांतील प्रकरणे न्यायालयात सुरू आहे. याबाबत पोलीस ठाण्यातही प्रकरणे सुरू आहे. अशातच प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने कार्यालयातून परत यावे लागत आहे. त्यात पैसा आणि वेळ ही खर्च होत आहे.
बॉक्स
चिखल तुडवतच शेतावर प्रवास
तालुक्यात अनेक रस्ते अजूनही झालेले नाही. त्यामुळे शेतात जाण्यासाठी चिखल तुडवत शेतकऱ्यांना जावे लागत आहे. मुख्य रस्त्यापासून पांदण रस्ते १ ते २ किलोमीटर अंतरावर असल्याने काही ठिकाणी बैलगाडी जाण्याचा सुद्धा मार्ग नाही तर अनेक शेतकऱ्यांनी पांदण रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणांमुळे पलीकडील शेतकऱ्यांना कसे जावे, असा प्रश्नही निर्माण झाला आहे तेव्हा पांदण रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.