देवाडा खुर्दमध्ये अनेक वर्षापासून पाण्याची भीषण टंचाई

By admin | Published: May 2, 2017 12:59 AM2017-05-02T00:59:45+5:302017-05-02T00:59:45+5:30

तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईची धग सुरू आहे.

The severe shortage of water for many years in the Godda Khurd | देवाडा खुर्दमध्ये अनेक वर्षापासून पाण्याची भीषण टंचाई

देवाडा खुर्दमध्ये अनेक वर्षापासून पाण्याची भीषण टंचाई

Next

पाणी पुरवठा योजनेला ग्रहण : नागरिक दहा वर्षापासून नळाच्या प्रतीक्षेत
पोंभूर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईची धग सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र आजमितीला आठ वर्षाचा कालावधी लोटूनसुद्धा सदर टाकीमध्ये पाणीच साठविण्यात न आल्याने ही टाकी स्वत:च पाण्यासाठी व्याकुळ झाली असल्याचे भीषण वास्तव येथील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.
दुसरीकडे मात्र संबंधित विभागाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्यास दिरंगाई करीत असून गावकरी व सरपंचांनी दिलेल्या तक्रार अर्जास कचऱ्याची टोपली दाखविली असल्याचा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. गावात दरवर्षी पाणी टंचाई भासत असून प्रशासनाकडून कुठलीच पर्यायी योजना केली जात नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले रामपूर दीक्षित टोला नं. १ व २ येथील नागरिक गेल्या दहा वर्षापासून नळाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द मागील १५ वर्षापासून ७२ हजार लीटर क्षमतेची ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. दरवर्षीच्या लोकसंख्या वाढीमुळे नळजोडणी धारकांच्या संख्येतही भर पडत आहे. सदर योजनेच्या पाईप लाईनचे काम अत्यंत सदोष पद्धतीने झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजमधून पाणी जात असते तर कधी कधी लिकेज दुरुस्त करण्यास दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागत असल्याने स्थानिक नागरिकांना अल्प व अनियमीत पाणी मिळत असते. या गावातील पाण्याचे स्तोत्र फार खोलवर असल्याने एप्रिल-मे महिन्यातच पाण्याची टंचाई सुरू असते. त्यामुळे अनेक नागरिक उन्हाळ्यामध्ये तलाव व शेतातील विहिरीचे पाणी बैल बंडीने आणून आपली पाणी विषयक समस्या सोडवित असतात. या नेहमीच्या पाणी टंचाईला कंटाळून गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेची निर्मिती केली. यावर देखरेखीसाठी पाणी पुरवठा समितीची स्थापनासुद्धा करण्यात आली आणि एका कंत्राटदाराकडे सदर योजनेचे बांधकाम सोपविण्यात आले. मात्र या कामावर पाणी पुरवठा समिती तसेच ग्रामपंचायत व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे कुठलेच नियंत्रण नसल्याने सदर योजनेला आठ वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटून सुद्धा ही योजना अजूनही तहानलेलीच आहे. या ठिकाणी पाण्याच्या भुगर्भाची पातळी अतिशय खोल गेल्याने मार्च-एप्रिल महिन्यामध्येच अनेक विहिरी कोरड्या होत असतात तर हॅन्ड पंपांना फार अल्प पाणी असते. गावात अनेक वर्षापासून ही परिस्थिती भेडसावत आहे. एवढी गंभीर समस्या या ठिकाणी उद्भवत असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीच पर्यायी योजना केली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.
येथील अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नागरिकांना पाणी दिले जाते. परंतु उन्हाची दाहकता प्रचंड वाढत असल्याने अंधारी नदीच्या पात्रातसुद्धा पाच ते दहा दिवस पाणी पुरणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अंधारी नदीचे पात्रसुद्धा येत्या काही दिवसात कोरडे होणार आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुवठा योजनेच्या टाकीत पाणी येणार नाही. मग पाणी आणायचे कुठून, असा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. मात्र पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व अभियंते याबाबत उदासीन असून त्यांचेसुद्धा यावर नियंत्रण नसल्याने गावात पाण्याच्या दोन टाकी असून सुद्धा गावातील नागरिक तहाणलेलेच आहे. कोरड्या असलेल्या भारत पाणी पुरवठा योजनेमध्ये फार मोठे गोडबंगाल झाले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलल्या जात आहे. संबंधित प्रकरणाची वरिष्ठांमार्फत चौकशी केल्यास फार मोठे घबाड उघडकीस येणार असल्याचे समजते. त्यामुळे संबंधित टाकीचे पाणी कुठे मुरत आहे, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)

पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे
पोंभूर्णा तालुक्यामध्ये देवाडा खुर्द हे गाव सर्वात मोठे असून सदर क्षेत्र पालकमंत्री मुनगंटीवार यांचे आहे. पोंभूर्णा तालुक्याला महाराष्ट्रात अग्रेसर करू असे पालकमंत्री व त्यांचे कार्यकर्ते नेहमी निवडणुकामध्ये सांगत असतात. मग अनेक वर्षापासून या गावात पाणी टंचाई असल्याने पालकमंत्र्यांनी या ठिकाणी पर्यायी योजना निर्माण करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: The severe shortage of water for many years in the Godda Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.