सात गावांना वादळाचा जोरदार तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:03 PM2019-05-21T23:03:52+5:302019-05-21T23:04:09+5:30
तालुक्यातील मिंथूर, नवेगाव पांडव, मिंडाळा, बागल मेंढा, किरमिटी या गावांना मंगळवारी वादळाचा जोरदार फटका बसला. या गावातील शेकडो घरांचे कवेलू व टीन उडाल्याने अनेकांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान किरमिटी येथे वीज पडून १४ वर्षीय मुलगा ठार, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. एक बैलजोडीही ठार झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तालुक्यातील मिंथूर, नवेगाव पांडव, मिंडाळा, बागल मेंढा, किरमिटी या गावांना मंगळवारी वादळाचा जोरदार फटका बसला. या गावातील शेकडो घरांचे कवेलू व टीन उडाल्याने अनेकांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान किरमिटी येथे वीज पडून १४ वर्षीय मुलगा ठार, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. एक बैलजोडीही ठार झाली आहे.
तन्मय माधव चौधरी असे मृत मुलाचे नाव आहे. तर कल्पना माधव चौधरी असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिला मृतक मुलाची आई आहे. तन्मय आणि त्याची आई कल्पना हे पावसामुळे गोठ्यातील बैल आणण्यासाठी गेले होते. यादरम्यान वीज कोसळली. किरमिटी येथीलच एक बैलजोडीही वीज पडून ठार झाली आहे. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास पारडी परिसरात जोरदार वादळ व पाऊस आला. एक तास वादळाचा हा तांडव चालला. पारडी येथील रमेश रघुनाथ कन्नाके हे अंगावर घराची भिंत कोसळल्याने जखमी झाले. या वादळात मिंथूर येथील १०० हून अधिक घरांची पडझड झाली. मिंथूर येथील मुख्य रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने मिंथूर मिंडाळा हा महत्त्वाचा रस्ता बंद झाला. अनेक विद्युत खांबही वाकले आणि खाली पडले. सातही गावातील वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान, नवेगाव पांडव येथील ५० घरांचे नुकसान झाल्याची आहे. पारडी, मिंडाळा, बागल मेंढा, किरमिटी येथे किती घरे पडली, याचा तपशील कळू शकला नाही.