नागभीड शहरात तीव्र पाणीटंचाई, चवडेश्वरी प्रभाग प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:58+5:302021-05-15T04:26:58+5:30
नागभीड : येथील मध्यवस्तीत असलेल्या चवडेश्वरी प्रभागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नगर पालिकेने पाण्याचे टँकर ...
नागभीड : येथील मध्यवस्तीत असलेल्या चवडेश्वरी प्रभागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नगर पालिकेने पाण्याचे टँकर लावून या पाणी टंचाईवर तोडगा काढावा, अशी या प्रभागातील नागरिकांची मागणी आहे.
शहरातील इतर प्रभागाप्रमाणे या प्रभागातही नळ योजना असली तरी सध्या या प्रभागातील नळांना अतिशय कमी प्रमाणात पाणी येत असते. परिणामी नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. कधी कधी तर पाणी येतच नसल्याची नागरिकांची ओरड आहे.
विहिरींवरून पाणी घेऊ म्हटले तर या प्रभागात असलेल्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. चवडेश्वरी मंदिराजवळ असलेल्या विंधन विहिरीवर सौरऊर्जा पंप लावण्यात आला आहे. आता हाच सौरऊर्जा पंप आता या प्रभागाचा पाण्यासाठी आधार ठरत असला तरी या पंपालाही काही मर्यादा आहेत. या पंपावर पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बसविण्यात आली असली तरी याच टाकीतून जवळच असलेल्या अन्य एका मोहल्ल्यात पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती आहे. त्यामुळेही या प्रभागातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यातच ही टाॕकी भरण्यास बराच अवधी लागत असल्याने त्याचाही परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
या प्रभागात वास्तव्यास असणारे नागरिक श्रीमंत वर्गातील नाहीत. त्यामुळे ते घरी विंधन विहीर खोदू शकत नाही. येथील नागरिकांना सर्वस्वी सार्वजनिक उपाययोजनांवरच अवलंबून राहावे लागते. प्रभागात कामकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून पाण्यासाठी वाट पाहत बसावे की कामावर जावे हा मोठा प्रश्न सध्यातरी त्यांचेसमोर निर्माण झाला आहे.