मल:निस्सारण योजना ग्रहणांकित
By admin | Published: June 25, 2017 12:29 AM2017-06-25T00:29:18+5:302017-06-25T00:29:18+5:30
चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भुयारी मल:निस्सारण योजना आठ वर्र्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली.
नियोजनाचा अभाव : आठ वर्षानंतरही भिजत घोंगडे; कोट्यवधींच्या खर्चात नव्याने भर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भुयारी मल:निस्सारण योजना आठ वर्र्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली. मात्र प्रारंभापासूनच या योजनेला ग्रहण लागले होते. हे ग्रहण आजतागयत सुटू शकले नाही. या योजनेची प्रस्तावित किंमत योजना पूर्ण होऊ शकत नसल्याने सातत्याने वाढत राहिली. आतापर्यंत यात कोट्यवधींचा खर्च झाला असला तरी ही योजना योग्यरीत्या केव्हा कार्यान्वित होईल, याबाबत अजूनही संभ्रम आहे.
चंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर अनेक नवीन योजना प्रस्तावित आहेत. मात्र आजवर एकही योजना पूर्णत्वास येऊ शकली नाही. २००७ मध्येच या योजनेबाबत नगरपालिका स्तरावर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तेव्हा या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरीही देण्यात आली होती. २००९-१० मध्ये भूमिगत मल:निस्सारण योजना हाती घेण्यात आली. या योजनेचे कंत्राट शिवास्वाती कन्स्ट्रक्शन कंपनी, हैदराबाद यांना देण्यात आले. २००९ मध्येच वर्क आॅर्डरही निघाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. दोन वर्षात म्हणजे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र प्रारंभापासून या योजनेला समस्यांचे ग्रहण लागत आले. रस्ते, वीज केबल आदी अनेक बाबींमुळे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आली नाही. २०१२ पर्यंतही संबंधित कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर २०१३ पर्यंत पुन्हा मुदत वाढ दिली. आता २०१७ उजाडले आहे. मात्र भूमिगत मल:निस्सारण योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.
या योजनेत जे काम करण्यात आले. त्याचाही खेळखंडोबाच झालेला आहे. रहमतनगर परिसरात अगदी इरई नदीच्या पात्रातच या योजनेसाठी ट्रीटमेंट प्लान्ट उभारण्यात आला. मात्र नदीपात्रात असल्यामुळे तो पावसाळ्यात पाण्याखाली येतो. या योजनेचे दुसरे ट्रीटमेंट प्लान्ट पठाणपुरा परिसरात आहे. अनेक वॉर्डात पाईप लाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे. याशिवाय या योजनेतील पाईल लाईनची शहरातील मालमत्तेंशी जोडणीही झालेली नाही. ही योजना कशी काम करेल, याची तत्रज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र अशी तपासणीही करण्यात आलेली नाही. २०१७ चा उन्हाळा संपला. मात्र या कालावधीतही या योजनेचे काम बंदच होते, अशी माहिती आहे.
योजना अपूर्ण; मात्र जोडणी शुल्काची आकारणी
भुयारी मल:निस्सारण योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. या योजनेतील अनेक कामे शिल्लक आहे. तरीही मनपाच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात नागरिकांकडून भुयारी मल:निस्सारण जोडणी शुल्क व वार्षिक शुल्क आकारण्याची प्रस्तावित केले आहे. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकातही हे शुल्क आकारले होते. मात्र योजनाच कार्यान्वित झाली नाही.
योजनेची वाढली किंमत
भूमिगत मल:निस्सारण योजनेला प्रारंभ झाला तेव्हा योजनेसाठी ७० कोटींचा खर्च अपेक्षित होता. कामे वेळेत न झाल्याने योजना ९० कोटींवर गेली. आता पुन्हा योजनेची किंमत वाढून ती १०० कोटींच्याही पार गेली आहे. योजनेचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर पुन्हा जादा खर्च करावा लागणार आहे.