सावली शहर खादी चळवळीची माऊली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:17 PM2018-10-01T23:17:17+5:302018-10-01T23:17:40+5:30
सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. येथे १९३६ ला अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोनदा या शहराला भेट दिली. सात दिवस मुक्काम केला. सावली हे शहर खादी चळवळीची माऊली म्हणून सर्वोदयी चळवळीत ओळखली जाते. बदलत्या काळातही ग्रामोद्योगाचे महत्त्व वाढत आहे. परंतु, नवीन पिढीवर या चळवळीच्या संस्काराची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. येथे १९३६ ला अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोनदा या शहराला भेट दिली. सात दिवस मुक्काम केला. सावली हे शहर खादी चळवळीची माऊली म्हणून सर्वोदयी चळवळीत ओळखली जाते. बदलत्या काळातही ग्रामोद्योगाचे महत्त्व वाढत आहे. परंतु, नवीन पिढीवर या चळवळीच्या संस्काराची गरज आहे.
सावली येथील नाग विदर्भ चरखा संघाच्या आवारात या भारावलेल्या वातावरणाची अनुभूती येईल. येथील ८२ वर्षांच्या राजाबाळ संगीडवार यांनी येथील तेजस्वी इतिहासाच्या आठवणींना उजाळा दिला. इतिहासाची माहिती देताना संगीडवार म्हणाले, कार्यालयाच्या समोर तेव्हा उभ्या असलेल्या आम्रवृक्षाखाली महात्माजींचे नातू कृष्णदास गांधी व मनोज्ञा यांचा विवाह झाला. गांधीजींसोबत सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉ. करिअप्पा, जमनालाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशीला नायर आदी नेते या काळात सावली येथे मुक्कामी होते. चरखा संघाच्या प्राचीन वास्तूमध्ये गांधीजी आणि त्यांच्या कार्याचा शोध घेताना या महात्म्याने आयुष्यभर ‘खेड्याकडे चला’ हा नारा का दिला हे लक्षात आले. दोनशे चरख्यांवर काम करणारे शेकडो हात आजही सावली येथे सूत कताई करतात. चरखा संघात महिला- पुरूष सूत काततात. सुतापासून उत्तम प्रतीची खादी तयार होते. अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग कमिशनचा हा चरखा संघ ऐतिहासिक वास्तू आहे. १०० वर्षांपासून सूतकताई व खादी तयार करण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊर्जा देणारी चळवळ
खादी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सावलीला भेट दिली. मात्र हे गाव इतिहासात अजरामर झाले ते महात्मा गांधींंच्या दोन भेटीमुळे. गांधीजी १४ नोव्हेंबर १९३३ आणि २७ फेब्रुवारी १९३६ या दिवशी सावली येथे आले होते. २७ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत महात्मा गांधी याठिकाणी मुक्कामी होते. सात दिवसांत सावली ही देशाची राजकीय राजधानी झाली. चरखा संघातील इमारतीमध्ये या महामानवाचे वास्तव्य होते. आजही या इमारतीत महात्माजींच्या वास्तव्याच्या आठवणी अनेक वस्तू करून देतात. चरखा संघ उत्तम रितीने आजही कार्यरत आहे. अनेक इमारती वैभवशाली इतिहास मूकपणे सांगतात. जुन्या चरख्यांकडे बघितल्यानंतर शेकडो परिवाराला रोजगार देण्याची ऊर्मी, एकतेची कळकळ, अस्पृश्यता निवारणाची चळवळ व स्वावलंबत्वाची मशाल या चरख्यामध्ये पेटत होती, हेही लक्षात येते.