चंद्रपूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:20 PM2018-08-03T14:20:44+5:302018-08-03T14:21:24+5:30

इरई धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने महऔष्णिक विद्युत केंद्रही आॅक्सिजनवर आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती बघता चंद्रपूर जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे.

Shadow of drought on Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

चंद्रपूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

Next
ठळक मुद्देपावसाची दडी : २६ टक्के धान रोवण्याचा खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या वर्षी पावसाने दगा दिला. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तविले होते. मात्र हे अंदाज चंद्रपूर जिल्ह्यात फोल ठरले. पावसाळ्याचे दोन महिने निघून गेले असून आतापर्यंत केवळ ५७ टक्केच पर्जन्यमान जिल्ह्यात झाले आहे. धानपट्टा अल्प पावसाने चिंतेत आहे. इरई धरणाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने महऔष्णिक विद्युत केंद्रही आॅक्सिजनवर आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. ही परिस्थिती बघता चंद्रपूर जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि धान हे मुख्य पीक घेतले जातात. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, भद्रावती व वरोरा या तालुक्यांना कापूस व सोयाबीनचा पट्टा म्हणून ओळखले जाते. या भागात यंदा समाधानकारक पाऊस झाला. कोरपन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेकांच्या शेतातील पीक खरडून गेले. या पट्ट्यात ३९ टक्के कपाशी व ४० टक्के सोयाबीन अशी एकूण ७९ टक्के पेरण्या आटोपल्या आहे. विपरित परिस्थिती धान पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिपरी, पोंभूर्णा, मूल, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले पऱहे उन्हाने करपत आहे. लागवडीसाठी धानाच्या बांद्यात पाणी साचणे आवश्यक असते. पावपाचे प्रमाण चिंताजनक असल्याने २६ टक्के धान रोवण्या खोळंबल्या आहेत. दरवर्षीचा वाईट अनुभव आणि सध्या पावसाने मारलेली दडी बघता ही पिके शेवटपर्यंत टिकतील, याबाबत शेतकरी साशंकच आहे.

नागभीड तालुक्याची स्थिती चिंताजनक
धानपट्ट्यातील नागभीड तालुक्यात केवळ ३१.८६ टक्के पाऊस झाला आहे. काही शेतकऱ्यांनी पऱहेच टाकले नाही. ज्यांनी पऱहे टाकले ते करपत आहे. रोवण्या पूर्णत: खोळंबल्या आहे. एकूणच या तालुक्यात भीषण दुष्काळाचे चित्र आतापासूनच दिसायला लागले आहे.

महाऔष्णिक वीज केंद्र आॅक्सिजनवरच
दोन महिन्याच्या पावसात इरई धरणात अपेक्षित जलसंचय झाला नाही. सद्यस्थितीत केवळ ३४ टक्केच जलसाठा धरणात आहे. या धरणाच्या पाण्यापासून महाऔष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मिती होते आणि चंद्रपूर महानगराची तहान भागविली जाते. हे धरण भरले नाही तर वरच्या भागातील चारगाव धरणातून पाणी घेतले जाते. चारगाव धरण ८९.५४ टक्के भरल्याने काहीशी समाधानकारक स्थिती म्हणता येईल.

Web Title: Shadow of drought on Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.