मूल तालुका दुष्काळाच्या छायेत

By Admin | Published: November 30, 2015 12:54 AM2015-11-30T00:54:45+5:302015-11-30T00:54:45+5:30

निसर्गाच्या अवकृपेमुळे पडलेला अत्यल्प पाऊस शेतकऱ्यांना चिंतातुर करणारा ठरला.

In the shadow of the original taluka drought | मूल तालुका दुष्काळाच्या छायेत

मूल तालुका दुष्काळाच्या छायेत

googlenewsNext

उत्पादन घटले : शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा
राजू गेडाम मूल
निसर्गाच्या अवकृपेमुळे पडलेला अत्यल्प पाऊस शेतकऱ्यांना चिंतातुर करणारा ठरला. पावसाचे अल्प प्रमाण असतानादेखील रोवणीनंतर पाऊस येईल ही नाही, या चिंतेतच शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली. बँकेतून कर्ज घेऊन केलेल्या रोवणीचे फलीत होईल ही आशा बाळगून केलेल्या रोवणीवर पाणी फेरले गेले. अनेकांचे पाण्याअभावी शेतावरच पिक करपले. लाखो रुपयाचा चुराडा होत असताना शेतकऱ्यांनीही हाय खाल्ली. ज्यांना पाण्याची काही प्रमाणात सोय उपलब्ध होती, त्यांचे उत्पादन घटले. लावलेला पैसा मिळाला नसल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याचे चित्र मूल तालुक्यात दिसत आहे.
बँकेतून घेतलेल्या कर्जावर कपात केलेला पीक विमा तरी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना असल्याने ते शासनाच्या आणेवारीकडे आस लावून बसले आहेत. मूल तालुक्यात १८७०६.०९ हेक्टर आर जागेवर धानाची रोवणी करण्यात आली. यात ४५९.१६ हेक्टर आर जागेत आवत्या पेरण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे तालुक्यात सरासरी पाऊस ११४१.५ मिमी पडतो. मात्र यावर्षी १०४१.६ मिमी पाऊस पडला आहे. एकंदरीत ९४.५ मिमी पावसाची घट झाली. हा पाऊस पडला असता तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडणार अशी घोषणा करून जलपूजनदेखील करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळेल, या आशेने मनात नसतानादेखील धानाची रोवणी केली. मात्र गोसेखुर्द धरणाचे पाणी न पोहचल्याने धानाचे पिक पाण्याअभावी करपले. यावर्षी ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय उपलब्ध होती. त्यांना पीक झाले असले तरी धानाचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगतात. लावलेला पैसादेखील निघणार नसल्याने मूल तालुक्यातील शेतकरी चिंतातुर दिसत आहेत. मूल तालुक्याची जर अंदाजे आणेवारी ही ५० पैशापेक्षा जास्त आहे. नजरअंदाज आणेवारी ही ५० पैशाच्या वर असल्याने दुष्काळ जाहीर होणार की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र प्रत्यक्षात डिसेंबर-जानेवारी महिन्यात पैसेवारी काढली जाते. त्यात तालुका दुष्काळग्रस्त घोषित होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मूल येथून तीन हजार ५२४ शेतकऱ्यांनी १३ लाख ३९ हजार १४० रुपये भरून पीक विमा काढला आहे. यावेळी दुष्काळाची परिस्थिती असल्याने बँकदेखील पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत होते. मात्र प्रत्यक्ष पैसेवारी ५० पैशाच्या आतमध्ये आल्यावरच तालुका दुष्काळामध्ये समाविष्ट होऊन पीक विम्याचा लाभ मिळू शकेल. मागील वर्षी पीक विम्याचा लाभ मूल तालुक्यातील जनतेला मिळाला नव्हता. उर्वरित जवळपास सर्वच तालुक्याला मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांचे पिके शेतातच करपली. तर ३० टक्के शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन आले असले तरी उत्पादन घटल्याने लावलेला पैसा निघणार नसल्याचे बोलले जात आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे.

Web Title: In the shadow of the original taluka drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.