या शांताराम बापूंना मानावेच लागेल!
By admin | Published: February 3, 2017 01:07 AM2017-02-03T01:07:39+5:302017-02-03T01:07:39+5:30
चंद्रपूरला सांस्कृतिक चेहरा देण्यात ्रज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, त्यात अग्रणी आहेत माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री
मानाचे मोठे आयोजन : चंद्रपूरला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल
वसंत खेडेकर बल्लारपूर
चंद्रपूरला सांस्कृतिक चेहरा देण्यात ्रज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, त्यात अग्रणी आहेत माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे अर्थात शांताराम बापू ! आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट निर्माण करणारे चित्रपती व्ही. शांताराम (शांताराम बापू) यांना जशी कलेची जाण आणि आवड होती, तशीच आवड व जाण शांताराम पोटदुखे यांनाही आहे. ही त्यांची राजकारणात येण्यापूर्वीपासून आहे.
त्यांच्या पुढाकाराने राजकारणाशी संबंध नसताना चंद्रपूर येथे जानेवारी १९७९ ला ५३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्युबिली हायस्कूलच्या पटांगणावर झाले होते. ते त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्याचे यशस्वी आयोजन त्यांनी (सोबतीला मदनराव धनकर) केले होते. हा मान त्यावेळी चंद्रपूरला शांतारामजींच्या प्रयत्नाने मिळाला होता.त्यानंतर ते राजकारणात गेले. चारदा खासदार बनून केंद्रात राज्यमंत्री झाले. परंतु, समाजकारण व सांस्कृतिक कार्य त्यांनी बंद केले नाही. राजकारणातून अंग काढल्यानंतर तर त्यांची या कार्यात अधिक रूचि वाढली आणि त्यांनी या कामात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नियमित होत असते. कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला असो वा कुणी दुसऱ्यांनी, त्या कार्यक्रमात अतिथी वा प्रेक्षक म्हणून त्यांची उपस्थिती ठरलेलीच! या असल्या कार्यक्रमांकरिता त्यांच्या सरदार पटेल महाविद्यालयाचे द्वार नेहमी उघडे ! त्याचे कारण शांतारामजींची या क्षेत्रात असलेली आवड आणि या क्षेत्रात जिल्ह्यातील कलावंत पुढे जावेत, सांस्कृतिक चळवळ नित्य सुरू राहावी ही त्यांची तळमळ!
मराठी साहित्य संमेलन घेणे सोपी गोष्ट नाही. ही जबाबदारी त्यांनी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात ८५ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद घेऊन ते यशस्वीरित्या पार पाडले. आठवणीत राहावा, असा तो साहित्य मेळावा होता. याचे संपूर्ण श्रेय शांताराम बापूंना जाते. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांच्यातील कलेविषयीचा दांडगा उत्साह प्रेरणादायी आहे. फिल्म फेस्टिव्हल बहुधा मुंबई, पुणे, गोवा अशा ठिकाणीच होत असतात. तो शांताराम बापूंच्या पुढाकाराने व प्रयत्नाने चंद्रपूरला होणार आहे. फिल्म डिव्हिजन, माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने तो १४ फेब्रुवारीला होत आहे.
चंद्रपूरला केवढा हा मोठा मान आणि किती महत्त्वाचे आहे आयोजन! यात दिग्दर्शक जब्बार पटेल फिल्म मेकिंगचे धडे देणार असून प्रख्यात छाया चित्रकार ए. एस. एच. खान हे चित्रिकरणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यात आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी माहिती चित्रपट दाखविले जातील. फिल्म मेकिंग काय असते आणि फिल्म फेस्टिव्हल कसा करतो, हे या आयोजनातून जिल्ह्यातील रसिकांना-तरुणांना बघायला मिळणार आहे. या आयोजनात शबाना आजमी, ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ख्यातीप्राप्त दिग्दर्शक अडूर गोपालकृष्ण्न हजेरी लावणार आहेत. हे आयोजन शांताराम बापूंच्या पुढाकाराने होत आहे. त्यामुळे, चंद्रपूरच्या या कलासक्त शांताराम बापूंना मानावेच लागेल!