शरद पवारांचा दौरा; चंद्रपूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 09:25 PM2021-11-18T21:25:11+5:302021-11-18T21:25:38+5:30

Chandrapur News राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हा दौरा चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत.

Sharad Pawar's visit; Indications of a new political equation in Chandrapur district | शरद पवारांचा दौरा; चंद्रपूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणाचे संकेत

शरद पवारांचा दौरा; चंद्रपूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणाचे संकेत

Next
ठळक मुद्देशून्य पक्षबळ असलेल्या चंद्रपुरात राष्ट्रवादी नेत्यांचे दौरे वाढले

राजेश भोजेकर

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे गुरुवारी सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झाले. त्यांचा हा दौरा चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पक्षाचा परफॉर्मन्स जिल्ह्यात शून्य असताना स्थानिक नेत्यांचे लक्ष लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर आहे.

नेमका हाच धागा धरून मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रपूरचे दौरे केले. विविध पातळ्यांवर चाचपणी केल्याचे दिसून आले. आता पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: येत आहेत. या अनुषंगाने या दौऱ्याला राजकीय रंग असल्याचे बोलले जात आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्ष साशंक होता. धानोरकर हे विनर कँडिडेट असल्याची बाब शरद पवार यांच्या काँग्रेसश्रेष्ठींच्या कानावर घालताच लगेच काँग्रेसने जाहीर केलेली विनायक बांगडे यांची उमेदवारी मागे घेतली.

ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला द्या, आम्ही धानोरकरांनाच उमेदवारी देऊ, अशी भूमिकाही त्यांनी घेतली असल्याचे काही नेते खासगीत सांगतात. पवारांचा शब्द काँग्रेसने मान्य केला. धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसला राज्यात अस्तित्व टिकवून ठेवता आले. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्ह्याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीतही चंद्रपूरच्या जागेसाठी किशोर जोरगेवार यांच्याबाबतीत असेच घडले होते.

अखेर जोरगेवार अपक्ष लढले आणि विक्रमी मतांनी जिंकले. चंद्रपूरच्या राजकारणात पवारांना नक्कीच काहीतरी घडवायचे आहे. हे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या चाचपणीवरून लक्षात घेण्यासारखे आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुरूवातीला येऊन गेले. अनेक विविध राजकीय पक्षांतील नाराज नेत्यांशी बंदद्वार चर्चा केली. याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना कळविला. त्यानंतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते चंद्रपूरच्या वाऱ्या करीत आहेत.

विदर्भाचे ओबीसीचे नेते डाॅ. अशोक जिवतोडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा याचाच एक भाग होता. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची ही व्यूहरचना असल्याचे बोलले जात आहे. पक्षनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पक्षाचा आढावा घेतला. तेव्हा जिल्ह्याला पक्षश्रेष्ठींनी आघाडी असल्यास विधानसभेच्या तीन जागा पदरात पाडून घ्याव्यात, असा आग्रह धरला. यामध्ये बल्लारपूर, चंद्रपूर आणि चिमूर या जागांचा समावेश असल्याची चर्चा ऐकायला आली. परंतु, स्थानिक स्वराज संस्थेत पक्षाची ताकद नसल्याचे लक्षात येताच खा. सुळे यांना या निवडणुकांमध्ये पक्ष वाढवा तरच विचार केला जाईल, असे स्पष्ट सांगितले होते.

यासाठी पक्षाचे नेतेही झटत असल्याचे शरद पवारांच्या या दौऱ्यातून दिसून येत आहे. पवार नेमकी काय रणनीती आखून जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने राजकीय मंडळींचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Sharad Pawar's visit; Indications of a new political equation in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.