चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग; सर्व स्तरातून कौतुक

By साईनाथ कुचनकार | Published: August 28, 2023 05:31 PM2023-08-28T17:31:04+5:302023-08-28T17:32:21+5:30

अभिमानास्पद आणि प्रेरणादायी केले कार्य

Sharwari Gundawar of Chandrapur's participation in the Chandrayaan mission | चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग; सर्व स्तरातून कौतुक

चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग; सर्व स्तरातून कौतुक

googlenewsNext

चंद्रपूर : भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली चंद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. या मोहिमेमध्ये विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या लँडिंग झाले. त्यामधील प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन तेथील माहिती इस्रोकडे पाठविणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मार्गक्रमण करण्यासाठी रोव्हरला लागणाऱ्या ऊर्जेच्या निर्मितीसाठी सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. या पॅनलच्या निर्मिती प्रक्रियेत योगदान दिलेल्या टीममध्ये चंद्रपूरच्या शर्वरी शिरीष गुंडावार हिचा सहभाग होता. तिची ही कामगिरी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरत आहे.

शर्वरी ही मूळची चंद्रपूर येथील असून श्वेता व शिरीष गुंडावार यांची मुलगी आहे. ती सध्या बंगलोर येथे इस्रोच्या मुख्यालयात (युआरराव सॅटेलाइट सेंटर) येथे वैज्ञानिक या पदावर कार्यरत आहे. शर्वरीची आई श्वेता गुंडावार या सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर, वडील शिरीष गुंडावार व्यावसायिक आहेत.

अगदी लहानपणापासूनच शर्वरी अभ्यासात हुशार होती. तिने प्राथमिक शिक्षण चंद्रपुरातील डॉन इंग्लिश स्कूल येथे झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण तिने नारायणा विद्यालयातून पूर्ण केले. अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण बुटीबोरी येथील इरा इंटरनॅशनल स्कूल येथून घेतले. त्यानंतर फ्युचर विस्टा या संस्थेकडून कोचिंग घेतले. केरळमधील त्रिवेंद्रम येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी (आयआयएसटी) येथून बी. टेक. पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिची इस्रोमध्ये वैज्ञानिक या पदावर निवड झाली आहे.

चंद्रावर गेलेल्या चंद्रयान-३ या मोहिमेत शर्वरीचा सक्रिय सहभाग आहे. प्रज्ञान रोव्हरसाठी लागणारे सौर पॅनल बनविणाऱ्या पथकामध्ये तिने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

शर्वरीचे लहानपणापासून वैज्ञानिक होण्याचे स्वप्न होते. आता चंद्रयान मोहिमेत तिने ऊर्जा निर्मितीच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे. तिने घेतलेल्या शिक्षणाचा देशसेवेसाठी उपयोग झाला. यापुढेही असेच कार्य करेल, असा आम्हाला विश्वास आहे.

- प्रा.श्वेता शिरीष गुंडावार, शर्वरीची आई

Web Title: Sharwari Gundawar of Chandrapur's participation in the Chandrayaan mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.