प्रेमासमोर सातासमुद्रापारचे अंतर झाले थिटे; फॉरेनची लेक झाली पोवनीची सून !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 02:24 PM2024-08-12T14:24:30+5:302024-08-12T14:26:45+5:30

Chandrapur : भारतात येऊन केले लग्न आता स्वित्झर्लंडमध्ये होणार स्वागत समारंभ

She crossed the distance of seven oceans for love | प्रेमासमोर सातासमुद्रापारचे अंतर झाले थिटे; फॉरेनची लेक झाली पोवनीची सून !

She crossed the distance of seven oceans for love

बी. यू, बोर्डेवार, प्रकाश काळे 
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा/गोवरी :
प्रेमाला वयाचे, जातीचे, भाषेचे, अगदीच काय तर वर्णाचेही बंधन नसते. म्हणूनच प्रेमाची महती आजवर कुणीही टाळू शकला नाही, राजुरा तालुक्यातील पोवनी येथील युवकाने तर प्रेमासाठी सातासमुद्रापारचेही अंतर थिटे करून टाकले आहे. कामानिमित्त स्वित्झर्लंड येथे असलेल्या या युवकाचे तेथील एका युवतीशी प्रेम जुळले. लग्नाच्या आणाभाका झाल्या आणि तिला घेऊन तो चक्क आपल्या मूळ गावी पोवनी येथे आला. त्यानंतर कुटुंबीयांची समजूत काढत बल्लारपुरातील एका सभागृहात तिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. 


राजुरा तालुक्यातील पोवनी येथील उद्धवराव फुलझेले यांचे चिरंजीव मिनल फुलझेले यांचा विवाह स्वित्हालँडमधील डायना कॉड्राशिना नामक युवतीसोबत बल्लारपूर येथील संत तुकाराम सभागृहात ७ ऑगस्टला पार पडला. राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या कुशीत वसलेले पोवनी हे छोटेसे गाव. काही वर्षांपूर्वी उद्धव फुलझेले नोकरीच्या निमित्ताने बल्लारपूर येथे स्थायिक झाले. त्यांना दोन मुले आहेत. उद्धव फुलझेले यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आई आणि मुलावर कुटुंबाचा भार आला. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मुलगा अमेरिकेत तर दुसरा मुलगा मिनल हा स्वित्हार्लंड येथे शिक्षणासाठी गेला. मिनल फुलझेले शिक्षणानंतर तिथेच सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. या युवकाचे तेथीलच डायना कोंड्राशिना या युवतीसोबत प्रेम जुळले. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही थेट भारतात आले. आपल्या पोवनी येथील गावी गेले. त्यानंतर मिनलचे कुटुंब बल्लारपुरात राहत असल्याने ते बल्लारपुरात आले. मिनलने कुटुंबीयांना डायनाबाबत माहिती देत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर बल्लारपूर येथील संत तुकाराम महाराज सभागृहात ७ ऑगस्टला कुटुंबीयांच्या साक्षीने दोघेही विवाहबद्ध झाले. या विवाह सोहळ्याला माजी आमदार सुदर्शन निमकर हे सपत्नीक आवर्जून उपस्थित होते. याशिवाय फुलझेले कुटुंबीय व अॅड. प्रशांत घरोटे, पोवनीचे उपसरपंच सरला विजय फुलझेले, सुधाकर चंदनखेडे, प्रदीप बोबडे उपस्थित होते.


स्वित्झर्लंडमध्ये होणार स्वागत समारंभ
लवकरच मिनल आणि डायना हे दोघेही स्वित्झर्लंड येथील जिथे त्यांचे वास्तव्य आहे, त्या ज्युरीक शहरात परत जाणार आहेत, तिथे डायना हिच्या कुटुंबीयांकडून स्वागत समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मिनल फुलझेले यांनी दिली.
 

Web Title: She crossed the distance of seven oceans for love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.