‘ती’ बंदूक बल्लारपुरातील एका मृताच्या नावावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:51 AM2021-02-06T04:51:01+5:302021-02-06T04:51:01+5:30
राजुरा : येथील एका सलूनमध्ये घडलेल्या राजू यादव हत्याकांडात वापरलेली बंदूक बल्लारपुरातील एका मृताच्या नावावर असल्याची बाब पोलीस तपासात ...
राजुरा : येथील एका सलूनमध्ये घडलेल्या राजू यादव हत्याकांडात वापरलेली बंदूक बल्लारपुरातील एका मृताच्या नावावर असल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्राने दिली.
राजू यादव हत्या प्रकरणात चंदन सिंग व सतेंद्रकुमार सिंग हे दोघे आरोपी अटकेत आहेत. या आरोपींची तीन दिवसांची पोलीस कोठडी गुरुवारी संपली. न्यायालयात हजर केले असता दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता राजू यादव हत्याकांडात वापरलेली बंदूक बल्लारपूरातील एका मृताच्या नावावर असल्याची बाब पुढे आली. यामुळे आरोपींनी ती चोरली असल्याची शंका पोलिसांना आली. अधिक तपास केला असता बल्लारपूरातील एका इसमाकडून ती खरेदी केली होती. यानंतर कालांतराने त्या इसमाचा मृत्यू झाल्याचे आरोपी सांगत असल्याची माहिती पोलीस सूत्राने ‘लोकमत’ला दिली. आरोपी कितपत खरे सांगत आहे. याचा तपास पोलीस घेत असल्याचे समजते. हत्येकरिता वापरलेली बंदूक ज्यांच्या नावावर आहे. ती व्यक्ती मृत असली तरी त्याचे कुटुंबीय आहे. त्यांच्याकडून पोलीस याचा उलगडा करणार असल्याचेही राजुराचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी सांगितले. संबंधित कुटुंबाचे नाव पोलिसांनी गोपनीय ठेवले आहे.
अवघ्या सात-आठ महिन्यांच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात तीन मोठे हत्याकांड घडले. बल्लारपूरात सूरज बहुरिया याची हत्या गोळ्या घालूनच झाली होती. यानंतर चंद्रपूरात मनोज अधिकारी हत्याकांड घडले, या घटना ताज्या असताना राजुऱ्यात राजू यादव हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरलाय.