अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी
By admin | Published: September 25, 2016 01:12 AM2016-09-25T01:12:06+5:302016-09-25T01:12:06+5:30
सिंदेवाही तालुक्यातील पुरकेवार येथील काही नागरिक सरपणासाठी काड्या आणण्याकरिता गावाशेजारील जंगलात गेले असता
पुरकेपार येथील घटना : वनविभागाकडून अस्वलावर पाळत
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील पुरकेवार येथील काही नागरिक सरपणासाठी काड्या आणण्याकरिता गावाशेजारील जंगलात गेले असता अस्वलाने अचानक हल्ला करून आत्माराम नकडू कुंभरे (४८) याला गंभीर जखमी केले. सदर घटना शुक्रवारला घडली.
हुमन प्रकल्पालगत असलेल्या व गावासभोवताल जंगल असलेल्या पुरकेपार येथील काही नागरिक गावालगत असलेल्या गट नं ४४/२४० मधील जंगलात सरपणासाठी काड्या जमा करीत असताना अस्वलाने दुपारी ४ वाजताच्या सुमारास आत्माराम कुंभरे यांच्यावर हल्ला केला. मात्र सोबतच्या नागरिकांनी धोका लक्षात घेऊन आरडाओरड केली. त्यामुळे अस्वल पळून गेले. मात्र या हल्ल्यात कुंभरे यांच्या डोक्याला व हाताला गंभीर इजा झालेली आहे. त्यांना सिंदेवाही येथील दवाखान्यात नेले असता तिथून गडचिरोली रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी यांनी पुरकेपारला भेट देऊन तीन हजार रुपयांची तात्काळ मदत दिली. घटनास्थळावर पाळत ठेवण्याचे कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी रत्नापूरचे वनरक्षक आर.यू. शेख, नवरगावचे वनरक्षक चिकराम हे उपस्थित होते. पुन्हा कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वनाधिकारी सदर परिसरात लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)