‘ती’ आयएसओ जि.प. शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:23 PM2017-12-27T23:23:22+5:302017-12-27T23:24:29+5:30
एकीकडे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, यासाठी शासनाकडून कसोशीने प्रयत्न केला जातात.
आशिष देरकर ।
आॅनलाईन लोकमत
कोरपना : एकीकडे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, यासाठी शासनाकडून कसोशीने प्रयत्न केला जातात. दुसरीकडे मात्र शासनाने अस्तित्वात असणाºया शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांनी विद्यार्थ्यांसह गेडामगुडा येथील शाळेसमोर निदर्शने केली. इतर शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास पालकांनी बहिष्कार टाकला आहे.
कोरपना तालुक्यातील गोविंदपूर, गेडामगुडा, कोठोडा (खुर्द), चेन्नई (खुर्द) व भोईगुडा अशा पाच जि.प. शाळा १० पेक्षा कमी पटसंख्या असल्यामुळे बंद करण्यात आल्या आहे. बिबी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गेडामगुडा येथील जि. प. शाळेमध्ये एकूण आठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेला आयएसओ दर्जा प्राप्त झाला असून आजपर्यंत जवळपास चारशे शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत. ही उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या शाळेतील आठही विद्यार्थी इंग्रजी विषयात तरबेज आहेत. नुकत्यात झालेल्या बीटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत या आठही विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. गावातील लोकांनी लोकसहभागातून या शाळेला घडविले असल्यामुळे शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे गावकºयांना धक्का बसला आहे.
२०१२-१३ सत्रापासून प्रगत शाळा म्हणून या शाळेने नावलौकिक मिळवला असून शाळेने गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. असे असताना शासनाच्या दहा विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयात या शाळेचा समावेश आहे.
मात्र गावातील पालक आपल्या पाल्याला दुसºया कोणत्याही शाळेत पाठविण्यास तयार नाही. गेडामगुडा येथील आयएसओ शाळा सुरू न केल्यास शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही गावकरी आमरण उपोषण करू, असा इशारा सरपंच मंगलदास गेडाम यांनी दिला आहे.
हा तर आदिवासींवर अन्याय- सुभाष धोटे
'गाव तेथे शाळा' हे शासनाचे ब्रीद वाक्य होते. ठिकठिकाणी आदिवासींनी छोटे-छोटे पाडे व गुडे तयार करून आपल्या वस्त्या निर्माण केल्या. शहरी, ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त असे वेगवेगळे निकष ठेवून शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे. मात्र तसे न करता सरसकट दहा पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या निर्णयाविरोधात आपण आवाज उठवू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील शाळा असून गावकऱ्यांच्या साथीने या शाळेचा विकास झाला आहे. गावकऱ्यांनी शाळेसाठी मेहनत घेतली आहे. शाळेतील शैक्षणिक व भौतिक वातावरण प्रसन्न आहे. अशा शाळेला बंद करणे विद्यार्थी हिताचे नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ आहे.
- मंगलदास गेडाम
सरपंच, ग्रामपंचायत बिबी
आम्ही श्रमदानातून शाळा घडवलेली आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवलेली आहेत. एका शंभर टक्के आदिवासी पाड्यावरील शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय घातक आहे. आम्ही इतर शाळेत विद्यार्थी न पाठवता आमच्याच शाळेत विद्यार्थी पाठवू. अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांना घरी ठेवू.
- किशोर गेडाम, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती