ई-पीक नोंदणीसाठी ती धावली शेतकऱ्याच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:24+5:302021-09-23T04:31:24+5:30
विरुर स्टेशन : राजुरा तालुक्यातील वरुर रोड या गावात ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी बंधनकारक केली असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ...
विरुर स्टेशन : राजुरा तालुक्यातील वरुर रोड या गावात ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी बंधनकारक केली असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या संदर्भात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता, कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे अंतिम वर्षाला पदवीचे शिक्षण घेणारी मेघा सुकराज करमकर हिने अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच पीक पेऱ्याची नोंदणी करून दिली. शेतकऱ्यांनी हा ॲप कसा हाताळावा आणि त्यात माहिती कशी भरावी, ई-पीक पाहणीचे भविष्यात फायदे काय, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. एवढेच नाही, तर ग्रामीण कृषी कार्यानुभवाच्या माध्यमातून या आधी गावात अनेक प्रात्यक्षिके मेघाने करून दाखविली आहेत.
बीज प्रक्रिया, सुरक्षित कीड नियंत्रण, ॲझोला उत्पादन, कोविड लसीकरण, सुरक्षित तण नियंत्रण, मातीचे नमुने कसे तयार करायचे, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड यांच्या माध्यमातून २,००० ते २,५०० जनावरांचे लसीकरण केले. एवढेच नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून पिकांवरील रोग व कीड नियंत्रणासाठी अनेक उपाय शेतकऱ्यांना सांगितले. ई-पीक पाहणी करताना युवा समाजसेवक गावचे कृषिमित्र विशाल शेंडे, कृषी महाविद्यालय गडचिरोली येथील मेघा करमनकर, मारोतराव वादाफळे, तसेच कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील साहील तिजाळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
220921\img-20210922-wa0013.jpg
ई पीक पाहणीचे छायाचित्र