तिने दोनदा प्राप्त केला ध्वजारोहणाचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:02+5:302021-08-14T04:33:02+5:30
नागभीड : गावात ध्वजारोहणाचा मान प्रत्येकालाच मिळत नाही. मात्र तनया गजेंद्र खापरे या विद्यार्थिनीने हा मान दुसऱ्यांदा प्राप्त केला ...
नागभीड : गावात ध्वजारोहणाचा मान प्रत्येकालाच मिळत नाही. मात्र तनया गजेंद्र खापरे या विद्यार्थिनीने हा मान दुसऱ्यांदा प्राप्त केला आहे. तिच्या या सन्मानाचे गावात चांगलेच कौतुक होत आहे.
काही गावांचे वेगळे वैशिष्ट्य असते. या वैशिष्ट्यांमुळे त्या गावाची कधी कधी चर्चाही होत असते. असेच एक वेगळे वैशिष्ट्य नवखळा या गावाने जोपासले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत जो विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय येईल त्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे ठरले आणि गेल्या सहा वर्षांपासून नवखळा हे गाव हे वैशिष्ट्य जपत आहे.
नवखळा हे गाव नागभीडचे एक उपनगरच आहे. नागभीड येथे नगरपरिषद स्थापन करण्यात आली, तेव्हा या गावाला नगरपरिषदेत समाविष्ट करून घेण्यात आले. ग्रामपंचायत होती तेव्हा गावाच्या प्रमुख चौकातील ध्वजारोहण गावचे उपसरपंच करायचे. गाव नगरपरिषदेत समाविष्ट झाल्याने हे ध्वजारोहण कोण करेल हा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला. यावर विचारविनिमय सुरू असताना जे विद्यार्थी दहावी व बारावी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करतील त्या विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करावे, असे कोणीतरी सुचविले. ही कल्पना सर्वांच्याच पसंतीला उतरली आणि तेव्हापासून नवखळा येथे गावातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाची ही परंपरा सुरू आहे.
यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान बारावीत गावातून प्रथम आलेल्या तनया गजेंद्र खापरे या विद्यार्थिनीने मिळाला आहे. उल्लेखनीय बाब ही की, तनया दहावीच्या परीक्षेतही गावातून प्रथम आली होती आणि स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण केले होते.
130821\img-20210813-wa0031.jpg
तनया गजेंद्र खापरे