ती सांभाळतेय लाख महिलांची आरोग्य जबाबदारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:14+5:302021-06-04T04:22:14+5:30
पॉझिटिव्ह स्टोरी लोगो अतिदुर्गम भागात सेवा : पेशाने डॉक्टर; मात्र महिलांसाठी देवदूत जयंत जेनेकर कोरपना : सध्या कोरोनाचा भयावह ...
पॉझिटिव्ह स्टोरी लोगो
अतिदुर्गम भागात सेवा : पेशाने डॉक्टर; मात्र महिलांसाठी देवदूत
जयंत जेनेकर
कोरपना : सध्या कोरोनाचा भयावह काळ सुरू आहे. आरोग्याचे प्रश्न मोठे आहेत. या परिस्थितीतही कोरपना तालुक्यातील आदिवासीबहुुल भागात महिलांच्या आरोग्यावर ती एकटीच उपचार करत आहे. दुर्गम भागातील सेवेच्या अनुभवाच्या जोरावर ती वैद्यकीय अधिकारी लाख महिलांची जबाबदारी यशस्वी सांभाळत असून महिला सक्षमीकरणाचा परिचय देत आहे.
डॉ. शालिनी तरोने असे या कर्तव्यदक्ष महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव. कोरपना तालुक्यातील मांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या कार्यरत आहेत. विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती येथे बी.ए.एम.एस.चे वैद्यकीय शिक्षण घेऊन २००८ साली त्या वैद्यकीय सेवेत रुजू झाल्या. ताडाळी, तोहोगाव, जिवतीनंतर त्या २०१५ पासून मांडवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत आहेत. या परिसरात एकही महिला वैद्यक नाही. त्यामुळे डॉ. तरोने यांना जवळपास एक लाख महिला व अन्य रुग्णांची आरोग्यविषयक चिकित्सक जबाबदारी एकटीला यशस्वीरीत्या सांभाळावी लागत आहे. त्यातही त्या अनेक जोखीम पत्करून तत्परतेने सकारात्मक काम करीत आहेत.
मांडवा आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी गावे आदिवासीबहुल व अतिदुर्गम भागात वसली आहेत. या क्षेत्रात अनेक सुविधांची उणीव आहे. तेलंगणा सीमेवरील थिप्पापासून तर कोरपनापर्यंतचा भाग या केंद्राच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे येथे नियमित उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या सर्व रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यावर त्या उपचार करीत आहेत. महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर व प्रश्नावर त्या उपचारासोबत समुपदेशनही करतात. त्यांच्या वैद्यकीय सेवेने पंचक्रोशीत महिलांसाठी ''देवदूत'' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
दुर्गम अशा मांडवा आरोग्य केंद्राच्या प्रमुख आरोग्य अधिकारी म्हणून व्यवस्थापनाची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार दोन लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या कोरपना तालुक्यातील परिसरात त्या एकमेव महिला डॉक्टर आहेत. अनेक स्त्रीविषयक समस्या व आजारावर उपचार त्या एकट्या करीत आहेत. हा भाग अतिदुर्गम भागात मोडत असल्याने अनेक अंधश्रद्धा व गैरसमजुती मोठ्या प्रमाणात आहेत. या परिस्थितीतही लोकांचा आरोग्य व्यवस्थेवर विश्वास निर्माण करण्यात डाॅ. तरोने यांचे योगदान उल्लेखनीय ठरत आहे.