पाणपोईत मडक्यांऐवजी झारांनी घेतली जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:56 PM2018-04-20T22:56:07+5:302018-04-20T22:56:07+5:30
काळानुरुप विवधि क्षेत्रामध्ये बदल होत आहेत. या बदलाचा परिणाम पारंपरिक पाणपोईवर झाला आहे. मडक्यांची जागा आता झारांनी घेतल्याचे बल्लारपुरात दिसून येत आहे.
वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर: काळानुरुप विवधि क्षेत्रामध्ये बदल होत आहेत. या बदलाचा परिणाम पारंपरिक पाणपोईवर झाला आहे. मडक्यांची जागा आता झारांनी घेतल्याचे बल्लारपुरात दिसून येत आहे.
पाणपोई म्हटले की पूर्वी रस्त्याच्या कडेला बांबूच्या तट्याचे चौकोनी छोटे मंडप! त्यात माती खोदून ठेवलेले लाल रंगाचे तीन-चार मोठे मडके नजरेला दिसायचे. त्याभोवती लाल रंगाचे पातळ फडके. मडक्यातील पाणी थंडगार राहावे, याकरिता लाल फडक्यावर सतत पाणी शिंपडत जाणे. मंडपाच्या दर्शनी भागात लांब लाकडी पाटी, त्यावर एक दोन ग्लास आणि एक मग्गा... ही व्यवस्था म्हणजे मडक्यात पाणी भरणे ते पाणी तहानलेल्यांना देणे. याकरिता पाणपोईत एखादी महिला वा पुरुषाचे त्या मंडपात असणे! शहर, गावात अशा पाणपोई उन्हाळ्यात उभ्या असायच्या. या पाणपोई गावातील दानशूर व्यक्ती स्वखर्चाने लावत होते. लोकांची तृष्णा भागविण्यासारखे मोठे पुण्य नाही ही त्यामागची भावना! पुढे या पुण्यकार्यात सेवाभावी संस्था, सामाजिक व राजकीय पक्षांनीही लक्ष घातले. हे काम प्रसिद्धीने व्हावे, याकरिता पाणपोईवर आपल्या संस्थेचे बॅनर लावले जाते. मोठ्या व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन करून माध्यमांत फोटो छापून आणण्याची परंपरा सुरू झाली. पाणपोई वाढल्याने सर्वत्र पेयजल मिळण्याची सोय झाली. बाहेर पडणाऱ्या वाटेने जाणाºया लोकांची तृष्णा भागू लागली. या निमित्ताने दोन-तीन महिन्यांकरिताच का होईना. पण गरजवंताना पाणपोईतील काम मिळू लागले. पाणी फिल्टर करण्याचे तंत्र आले. काही वर्षांनंतर पाणी थंडगार ठेवण्याचे झार निघाले. त्या झारांना तोट्या लावल्या आणि सेल्फ सर्व्हीसने त्यातून पाणी मिळण्याची सोय झाली. त्यामुळे पूर्वीच्या पाणपोईचे स्वरुपच बदलले. आता पाणपोईत मडके ठेवणे पाणी वाढण्याकरिता रोजीचा माणूस ठेवणे बऱ्याच ठिकाणी बंद झाले आहे.
सावलीकरिता मंडप टाका किंवा एखाद्या इमारतीच्या आडोशाखाली टेबल ठेवा, त्यावर पाण्याचे झार ठेवा, ग्लास ठेवा. पाणपोईचे बॅनर लावा. लोकांचे सहजपणे लक्ष जाते. तहानलेला माणूस येतो. ग्लासने झारमधील पाणी घेऊन पितो आणि पाणपोई लावणाºयाला मनोमनी धन्यवाद देऊन पुढे जातो. पाणपोई लावण्याचा हाच मुख्य उद्देश ! फिल्टर पद्धतीनेमुळे आणि तोटी लावलेले थंड पाण्याचे झार बाजारात आल्याने ही जुनी पद्धत बदलली एवढेच! बाकी, प्रसिद्धीतंत्र तेच. संस्थेचे बॅनर लावा, मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून माध्यमांमध्ये फोटो छापा. काही संस्था प्रसिद्धीच्या दूर राहून पुण्याच काम करीत असतात. हल्ली बाटली बंद पाणी विकत मिळत असले तरी पाणपोईचे महत्व कमी झाले नाही. पाणपोई नित्य कितीतरी लोकांची तृष्णा भागवत आहे. त्यानिमित्ताने लोकांच्या हातून सेवा कार्य होत आहे. पाणपोईचे रूप बदले, सेवा मात्र तिच. तहानलेल्यांची तृष्णा भागविण्याची!
मुक्या जनावरांची सुविधा
भागविण्याकरिता शहर व गावात पाणपोई लागतात. मुक्या प्राण्यांची तृष्णा कशी भागणार? त्यावर उपाय म्हणून विसापूर येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र इटनकर यांनी विसापुरात रस्त्याला लागून असलेल्या शेतात, रस्त्याच्या कडेला टाके बांधून त्यात पाणी साठविणे सुरु केले आहे. या पाणपोईत मुकी जनावरे तृष्णा भागवित आहेत.