शेगावच्या शेतकऱ्यांनी उभारला डाळ मिल उद्योग
By admin | Published: September 28, 2016 12:52 AM2016-09-28T00:52:35+5:302016-09-28T00:52:35+5:30
शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर पिकणाऱ्या मालावर घरीच प्रक्रिया करणे काळाजी गरज आहे.
संताजी शेतकरी गटाचा उपक्रम : पहिल्याच वर्षी भरघोस नफा
चंद्रपूर : शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर पिकणाऱ्या मालावर घरीच प्रक्रिया करणे काळाजी गरज आहे. ही गरज लक्षात घेता वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील शेतकऱ्यांनी डाळ मिलचा अनोखा उपक्रम सुरू करून इतर शेतकऱ्यांना कृषी आधारीत उद्योगांकडे वळण्याचा संदेश दिला आहे. पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येत केलेली ही सुरूवात पहिल्याच वर्षी भरघोस नफा देणारी ठरली आहे.
शेगाव (बु.) हे साधारणपणे ५ हजार ८०० लोकसंख्येचे गाव. गावातील शेतकरी परंपरेने कापूस, सोयाबिन, धान, तूर ही पारंपारिक पिके घेतात. हल्ली या पिकांना खर्च अधिक आणि त्या तुलनेने उत्पन्न कमी असल्याने यातून शेतकऱ्यांना फार नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषि आधारित प्रक्रीया उद्योगांकडे वळणे फार आवश्यक आहे. त्यासाठीच कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्यावतीने शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोगासाठी प्रवृत्त केले जात आहे.
शेगाव येथील शेतकऱ्यांना आत्माच्या योजनांची माहिती झाल्यानंतर विनोद राऊत या गावातील होतकरू शेतकऱ्यांने आत्माच्या सहकार्याने सन २०१२ मध्ये संताजी शेतकरी समुह गट स्थापन केला होता. गटाच्यावतीने शेतमालावर प्रक्रीया करून मुल्यवर्धन केल्यास त्यास चांगला भाव मिळू शकतो, ही भूमिका समोर ठेवत दालमिल सुरू करण्याचा निर्णय गटाने घेतला होता. आत्माच्यावतीने गटास या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच साठी काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थानांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेची माहिती दिली. आत्मा प्रकल्पाने गटास प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिले.
गटास स्वहिस्सा ४० टक्के भरावयाचा होता. गटातील सदस्यांनी मासिक बचतीतून ही रक्कम जमा केली. गटातील सदस्य विलास निखाते यांनी दालमिलसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने प्रत्यक्षात मिलला सुरूवात झाली.
गटातील प्रत्येक सदस्यास डाळ काढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदस्यांनी आपल्या गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये डाळ प्रक्रीयेबाबत जनजागृती केली. त्यामुळे इतर ठिकाणाहूनही येणाऱ्या अन्य शेतकऱ्यांच्या तुरीवर डाळ प्रक्रीयेची कामे करून दिली जात आहे. यातून मोठा नफा गटास मिळतो. (स्थानिक प्रतिनिधी)
भरघोस नफा
सर्व खर्च वजा जाता गटास दररोज सरासरी एक हजार रुपये नफा प्रथम वर्षी मिळत होता. त्यानंतर तो नफा सारखा वाढत गेला. गटाने आता शेतमालावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रीया करून त्याचे पॅकेज, बँडीग व मार्केटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर शेतकऱ्यांनीही या गटासारखा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्मा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.