शिवभोजन केंद्रसंचालकाचे अनुदान रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:19 AM2021-06-29T04:19:39+5:302021-06-29T04:19:39+5:30
चंद्रपूर : गरजू तसेच गरिबांना ताजे जेवण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यात शिवभोजन सुरू केले. लाॅकडाऊनच्या काळामध्ये ...
चंद्रपूर : गरजू तसेच गरिबांना ताजे जेवण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यात शिवभोजन सुरू केले. लाॅकडाऊनच्या काळामध्ये लाखो गरिबांना आधार मिळाला, मात्र शिवभोजन केंद्र संचालकांचे मागील तीन महिन्यांपासूनचे अनुदान रखडल्यामुळे त्यांना स्वत: उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
गरिबांसाठी सुरू केलेल्या या योजनेमुळे लाॅकडाऊनच्या काळात मोठा आधार मिळाला. लाॅकडाऊनपूर्वी दहा रुपये त्यानंतर प्रथम पाच रुपयात आणि आता तर पूर्णपणे शिवभोजन थाळी मोफत देण्याचा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला आहे. शिवभोजन केंद्र संचालकांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जात होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून अनुदान जमाच झाले नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्र कसे चालवावे, असा प्रश्न या केंद्र संचालकांना पडला आहे. दररोज शेकडो थाळी पुरवाव्या लागत आहे. यासाठी किराणा, गॅस तसेच केंद्रामध्ये काम करणाऱ्यांचे पगार द्यावे लागत आहे.
मात्र राज्य शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने अनेकांवर आता केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिवभोजन केंद्र संचालकांचे अनुदान त्वरित देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र -२६
दररोज किती जण घेतात लाभ -३७००
बाॅक्स
केंद्र संचालक म्हणतात....
शिवभोजन केंद्रामुळे गोरगरिबांची उपासमार टळली. मात्र आमच्या बिलांना मोठा विलंब होतोय. आर्थिक अडचणींवर मात करून आम्ही शिवभोजन केंद्र चालवतोय. राज्य सरकारने अनुदान दिल्यास केंद्र चालवणे सोयीचे होईल,
-शिवभोजन संचालक
कोट
राज्य सरकारने शिवभोजन केंद्र सुरू केल्यामुळे गरिबांना आधार मिळाला आहे. आम्हालाही रोजगार मिळाला आहे. मात्र घरून पैसे खर्च करून केंद्र चालवणे आता कठीण जात आहे. दररोज शंभर थाळी द्यावी लागते. अनुदान मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
केंद्र संचालक चंद्रपूर
बाॅक्स
असे मिळतात अनुदान
राज्य सरकारने गरिबांना मोफत शिवभोजन थाळी वितरण सुरू केले आहे. यामध्ये शहरी भागासाठी ४५ रुपये प्रती थाळी तर ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये प्रतिथाळीप्रमाणे शासन अनुदान देतात. किमान शंभर थाळीचे एका केंद्रातून वितरण केले जाते.
बाॅक्स
काय मिळतात थाळीमध्ये
शिवभोजन थाळीमध्ये दोन पोळी, एक वाटी भात, एक वाटी वरण, भाजी दिल्या जाते. लाॅकडाऊनच्या काळामध्ये पाॅर्सल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे केंद्रामध्ये बसून जेवण न करता लाभार्थ्यांना घरी जाऊन जेवण करता येत होते.
कोट
शिवभोजन केंद्राचे अनुदान देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. काही केंद्रचालकांच्या त्रुटी असेल त्या केंद्रसंचालकांचे अनुदान रखडले असेल. त्या त्रुटी दूर करून अनुदान देण्यात येईल.
-शालिकराव भराडी
जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर