शिवभोजन थाळीने भागविली आठ हजार लोकांची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:56+5:302021-06-09T04:35:56+5:30
कोरोना काळात मोफत वितरण सिंदेवाही : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी होत असताना, १५ ...
कोरोना काळात मोफत वितरण
सिंदेवाही : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी होत असताना, १५ एप्रिल ते ५ जूनपर्यंत जवळपास ५१ दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील शिवभोजन केंद्रावर आठ हजार थाळीचे मोफत वाटप करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब गरजू लाभार्थ्यांच्या पोटाला आधार मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिलपासून जिल्ह्यात व तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर रोजंदारीवर जाणाऱ्या गोरगरीब लोकांना भेडसावणारी जेवणाची समस्या सोडविण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या. शिवभोजन थाळी ही त्यापैकी एक आहे. शिवभोजन थाळी पाच रुपयांना उपलब्ध होत होती. निर्बंधाच्या कालावधीत हीच थाळी मोफत आणि पार्सलद्वारे उपलब्ध करण्यात आली. त्यानुसार तालुक्यातील शिवभोजन केंद्रावर रोज १५५ ते १६० गरीब गरजू लोकांना मोफत थाळी भोजन दिले. ५ जूनपर्यंत आठ हजार नागरिकांना याचा लाभ झाला. शिवभोजन केंद्राच्या स्वयंसेविका, महिला कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांच्या नातेवाईकांनाही २०० थाळी मोफत दिल्या.
बॉक्स
असे मिळते जेवण
शिवभोजन थाळीचे मोफत वितरण १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचा लाभ नागरिकांना होणार आहे. शिवभोजन थाळीमध्ये ३० ग्रामच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅम भात आणि १०० ग्रॅम वरण एवढे भोजन दिले जाते.