नेरीत माता मंदिर सभागृह खोदकामात आढळले शिवलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:36 PM2023-08-31T12:36:49+5:302023-08-31T12:38:08+5:30
महिलांची गर्दी : पूरातत्व विभागाकडून खोदकामास मनाई
चिमूर (चंद्रपूर) : सभागृहाचे खोदकाम करताना बुधवारी सकाळी दोन शिवलिंग आढळले. ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. नेरी येथील हेमाडपंती पार्वती मातेचे मंदिर आहे. दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असल्याने आमदार निधीतून या ठिकाणी सभागृहासाठी निधी मंजूर करण्यात आला. सभागृहाचे खांब बांधण्यासाठी खड्डा खोदण्यात आला.
नेरी येथील गुरुदेव सेवा मंडळच्या समोर प्राचीन हेमाड शिवमंदिर व बाजूलाच पार्वती शिवमंदिर आहे. सभागृहाची आवश्यकता लक्षात घेता ट्रस्टच्या मागणीनुसार आमदार बंटी भांगडिया यांनी ३० लाखांचा निधी देऊन सभागृह मंजूर केले. बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने १२ खड्डे खोदले होते. जेसीबीने खोदत असताना दोन शिवलिंग आढळले.
पुरातन विभागाने बांधकामास स्थगिती दिली. स्थगिती आल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी १२ खड्डे बुजविण्याचा निर्णय ट्रस्टी संजय डोंगरे व ग्रामपंचायत सदस्य संदीप पिसे, पिंटू खाटीक यांनी घेतला. शिवलिंग ट्रस्टच्या माध्यमातून शिवलिंगाची पूजा आरती करण्यात आली. भक्त गणांच्या दर्शनासाठी शिवलिंग मूर्ती जेथे होत्या तेथेच ठेवण्यात आल्या. शेकडो भक्त गणानी शिवलिंग मूर्तीचे दर्शन घेतले.