शिवनगरवासीयांची जागेच्या पट्ट्यांसाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:32 AM2021-08-24T04:32:21+5:302021-08-24T04:32:21+5:30
नागभीड : येथील शिवनगरमधील रहिवाशांची घराच्या जागेच्या पट्ट्यासाठी चांगलीच धडपड सुरू आहे. मात्र, शासन दरबारी त्यांच्या धडपडीला कवडीचीही किंमत ...
नागभीड : येथील शिवनगरमधील रहिवाशांची घराच्या जागेच्या पट्ट्यासाठी चांगलीच धडपड सुरू आहे. मात्र, शासन दरबारी त्यांच्या धडपडीला कवडीचीही किंमत नाही. जागेचे स्थायी पट्टे नसल्यामुळे आता घरकुल योजना त्यांच्यासाठी दिवास्वप्न बनली आहे.
शिवनगर नागभीड शहराचा एक उपनगर आहे. तहसील कार्यालयाजवळच शिवटेकडीच्या पायथ्याशी हे उपनगर वसले आहे. जवळपास ३०० घरांची वस्ती आहे. ही सर्व वस्ती अतिक्रमित असून, गेल्या २० ते २५ वर्षांपासून ते या जागेवर झोपड्या उभारून वास्तव्य करून राहत आहेत. या वस्तीत आता अनेकांनी पक्की, मजबूत सिमेंट काँक्रीटची घरे बांधली आहेत. उल्लेखनीय म्हणजे येथे वास्तव्य करून राहत असलेले अतिक्रमणधारक नागभीडच्या जुन्या वस्तीमधून आणि तालुक्यांच्या इतर गावातून आली आहेत.
या शिवनगरवासीयांची त्यांनी बांधलेल्या झोपड्यांच्या जागेचे पट्टे मिळावेत, यासाठी गेल्या काही वर्षांपासून मागणी करीत आहेत. मात्र, शासकीय यंत्रणेस त्यांच्या या मागणीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र, येथील तहसील कार्यालयाकडून या अतिक्रणधारकांना नोटीस बजावून दंड आकारला जात आहे. उल्लेखनीय, पट्टे मिळतील या अपेक्षेने काही आतिक्रमणधारकांनी दंड भरला तर काहींनी मात्र तहसील कार्यालयाच्या या नोटिसांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या.
मात्र, आता येथील रहिवाशांना नगर परिषदेकडून पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल योजनेचा लाभ मिळणे सुरू झाले आहे. यासाठी दोन लाभार्थ्यांची निवडही झाली होती अशी माहिती आहे. घरकुल योजनेच्या नियमानुसार जागा लाभार्थ्याच्या नावावर असली पाहिजे; मात्र शिवनगरवासीय वास्तव्य करीत असलेली जागा त्यांच्या नावावर नसल्याने या घरकुल योजनेचा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.