वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनी काठावरील देवटोकात आढळली शिवपिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:18+5:302021-05-30T04:23:18+5:30
चंद्रपूर : ‘नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये’ अशी म्हण प्रचलित आहे. मात्र, मानवी जीवनाचा आजवरचा विकास उलगडून ...
चंद्रपूर : ‘नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये’ अशी म्हण प्रचलित आहे. मात्र, मानवी जीवनाचा आजवरचा विकास उलगडून दाखविण्यासाठी नदी व ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व आधुनिक ज्ञानशास्त्रानेही मान्य केले आहे. असेच एक नवे स्थळ सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनी काठावर असलेले देवटोक होय. येथील नवीन मंदिराचे खोदकाम करताना २५ मे २०२१ रोजी पुरातन एक शिवपिंड आढळली. ही शिवपिंड पुरातन इतिहासाची साक्ष देणारी असून, भाविकांसोबतच संशोधकांनाही खुणावणारी असल्याचे मानले जात आहे.
देवटोक येथे नवीन मंदिराचे बांधकाम करण्यासाठी जेसीपीद्वारे खोदकाम सुरू आहे. मंगळवारी खोदकाम करताना जेसीपी चालकाला जमिनीत काहीतरी कठीण दगड लागल्याचा अंदाज आला. माती कोरून पाहिल्यानंतर जुने बांधकाम दिसून आले. त्यामुळे मंदिराचे ट्रस्टचे पदाधिकारी व गावकऱ्यांच्या समक्ष चालकाने खबरदारी घेऊन जेसीपीद्वारे माती काढली असता सुमारे पाच फूट लांबी आणि एका फूट उंची पुरातन शिवपिंड आढळली. ही माहिती पंचक्रोशीत पसरताच नागरिकांनी देवटोक येथे मोठी गर्दी केली. मंदिराचे पदाधिकारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत पूजाविधी करण्यात आली. यावेळी संदीप गड्डमवार, दिनेश चिटनुरवार, पं. स. सभापती विजय कोरेवार, माजी सभापती राकेश गड्डमवार, बंडू बोरकुटे, नितीन दुव्वावार, राजू सिद्धम, पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट देवटोक (शिर्शी)चे अध्यक्ष संत मुर्लीधर महाराज, उपाध्यक्ष पत्रू चुधरी, सचिव नरेश जकुलवार, गुणाजी ठोंबरे, सुरेंद्र उरकुडे, सूरज बोम्मावार, पुंडलिक पाल, नामदेव हजारे, भास्कर पोहनकार, नीलकंठ फाले, जिबगावचे सरपंच पुरुषोत्तम चुधरी, ग्रा. पं. सदस्य राकेश गोलेपल्लीवार उपस्थित होते. खासदार अशोक नेते यांनीही देवटोकला भेट बुधवारी दिली. सभामंडपासाठी १५ लाखांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. भाजप तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, नायब तहसीलदार सागर कांबडे, ठाणेदार शिरसाट व अन्य उपस्थित होते.
देवटोक परिसराचे पौराणिक महत्त्व
देवटोक हे गाव वैनगंगा नदी काठावर वसले आहे. नदीच्या पलीकडील तीरावर मार्कंडा हे हेमांडपंथी देवस्थान प्रसिद्ध आहे. त्यामुळे देवटोक म्हणजे मार्कण्डेय ऋषी यांचे वडील श्री मुरकेन्डेश्वर ऋषी यांचे स्थान असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे देवटोक येथील शिवपिंडाचा संशोधकांनी सखोल अभ्यास केल्यास या क्षेत्रातील इतिहास पुढे येऊ शकतो.
पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याकडून स्थळाची पाहणी
पुरातन शिवपिंड आढळल्याची माहिती मिळताच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी देवटोक येथे भेट दिली. शिवपिंडाची पूजा केली. या क्षेत्रात पुरातन इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आहेत. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात एवढ्या मोठ्या आकाराचे शिवपिंड आढळले नाही. त्यामुळे या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन क तीर्थस्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू. खनिज निधीतून रस्ता व सौंदर्यीकरणासाठी ६० लाखांचा निधीही मंजूर केला, अशी माहितीही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.