शिवसैनिक ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव खासदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:38 AM2019-05-25T00:38:00+5:302019-05-25T00:38:35+5:30
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील उकणी हे बाळू धानोरकर यांचे जन्मगाव. वडिल शिक्षक. बालपणापासूनच त्यांच्या मनावर संस्काराची बिजे पेरली गेली. शालेय जीवनात असताना महाराष्ट्रात हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात झंझावात होता. त्यांच्या तडाखेबाज भाषणाने तरुणाई त्यांच्या या विचाराने भाळली होती. तरुणपिढी बाळासाहेबांमध्ये आपला आवाज शोधत होती.
राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील उकणी हे बाळू धानोरकर यांचे जन्मगाव. वडिल शिक्षक. बालपणापासूनच त्यांच्या मनावर संस्काराची बिजे पेरली गेली. शालेय जीवनात असताना महाराष्ट्रात हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात झंझावात होता. त्यांच्या तडाखेबाज भाषणाने तरुणाई त्यांच्या या विचाराने भाळली होती. तरुणपिढी बाळासाहेबांमध्ये आपला आवाज शोधत होती.
बाळासाहेबांचे कुठेही भाषण असले की, त्या सभांना विराट गर्दी असायची. अशाच गर्दीत कुठेतरी बाळू धानोरकर हे विद्यार्थी दशेत असताना असायचे. बाळासाहेबांच्या विचाराने ते चांगलेच प्रभावित झाले. यामुळे त्यांना शिवसेना पक्ष आपलासा वाटू लागला. केवळ विचाराने प्रभावित होऊन ते थांबले नाहीत. तर त्यांनी त्या विचाराने वाटचाल करण्याचा निर्धार केला. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला. परिसरातील जनतेच्या समस्यांसाठी प्रशासनासोबत दोन हात करत त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्याने आकार घेत होते, हे त्यांनाही कळले नाही. अशातच त्यांच्या खांद्यावर किसान सेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदाची धुरा आली. शिवसेना आपल्या दबंग आंदोलनाने ओळखली जायची. या आंदोलनाला ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन म्हणून पुढे संबोधले जाऊ लागले. शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांना आपल्या स्टाईलने न्याय मिळवून दिला. याची पावती म्हणून त्यांच्यावर शिवसेना जिल्हा प्रमुखाची मोठी जबाबदारी आली. धानोरकर यांच्यात वरोरा-भद्रावती विधानसभा मतदार संघातील जनतेला आपला नेता दिसू लागला. त्यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढली. मात्र, त्यांच्यासारख्या तरूण नेतृत्त्वामुळे पक्षातील प्रस्थापितांनी त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिले आणि बंडखोर म्हणून त्यांचा मार्ग अडविला. त्यानंतर धानोरकर यांचे नेतृत्त्व आणखीनच तावून सलाखून निघाले आणि २०१४ च्या निवडणूकीत ते आमदार म्हणून विजयी झाले.