पाणीटंचाई विरोधात शिवसेनेचा घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 12:34 AM2017-05-09T00:34:53+5:302017-05-09T00:34:53+5:30
चंद्रपूर शहरातील भीषण पाण्याच्या टंचाईमुळे जनता त्रस्त झाली असताना येथील प्रशासन सुस्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील भीषण पाण्याच्या टंचाईमुळे जनता त्रस्त झाली असताना येथील प्रशासन सुस्त आहे. या प्रशासनाच्या विरोधात शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सोमवारी महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला.
‘जल दो नही तो जेल दो’ ‘शहरातील पाणी टंचाई दूर करा ’ असे घोषवाक्य देत मोर्चा महानगरपालिकेवर धडकला.
सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी काही ठळक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने ठिकठिकाणी लिकेज असलेल्या पाईप लाईन त्वरित दुरुस्त करणे, पाण्याच्या टाक्या पूर्ण भरणे, पाणी पुरवठा करण्यात येणारे व्हॉल्व पूर्ण खोलणे, नळाला तोट्या लावण्याबाबत कार्यवाही करणे, टिलुपंप जप्ती मोहीम राबविणे. शहरातील वाढलेल्या संख्येनुसार नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे, जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाईप लाईन टाकणे, इत्यादी मागण्या रेटून धरण्यात आल्या. त्यानंतर संयुक्तरित्या मागण्याचे निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आले. याप्रसंगी सुरेश पचारे, विशाल निंबाळकर, तसेच शिवसेना कार्यकर्ते बलराम डोडाणी, दीपक दापके, सुधीर माजरे, विलास वनकर, कैलास धायगुडे, राजेश नायडू आदी उपस्थित होते.