कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात शिवसेनेचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:18 PM2018-10-15T23:18:56+5:302018-10-15T23:19:14+5:30
कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. रात्री ऐवजी दिवसा कृषिपंपांना थ्री फेज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास ठिय्या दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. रात्री ऐवजी दिवसा कृषिपंपांना थ्री फेज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास ठिय्या दिला.
वरोरा तालुक्यातील खांबाडा व माढेळी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधून वीज पुरवठा करण्यात येतो. आठवड्यातील तीन दिवस रात्री १० ते ४ या काळात कृषिपंपांना थ्री फेज वीज पुरवठा देण्यात येतो. सदर पसिरारातील जंगलाला लागून शेती असल्याने रात्री वन्यप्राण्यांच्या भीतीने शेतकरी पिकांना पाणी देण्याकरिता शेतात जात नाही. सध्या सोयाबीनचे पीक निघाले असून शेतजमीन तयार करून दुसरे पीक घेण्याकरिता पाण्याची आवश्यकता आहे. असे असल्याने शेतकरी दुबार पीक घेऊ शकत नाही. कृषिपंपांना ज्यावेळी दिवसा थ्री फेज वीज पुरवठा दिला जातो, त्यात अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असतो तर कधी विजेचा दाब कमी होवून अनेक शेतकºयांच्या कृषीपंपाच्या मोटारी जळाल्या आहेत. त्यामुळे रात्री थ्री फेजचा वीज पुरवठा बंद करून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा मिळावा, या मागणीकरिता वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कक्षात शिवसेनेने दोन तास ठिय्या मांडला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती चिकटे, जामखुळाचे सरपंच पुरूषोत्तम पावडे, कामगार सेना वरोरा तालुका प्रमुख मनोज दानव, गजानन धोटे, अंबादास वावरे, संजय बोरकर, संदीप पावडे, अजाब पावडे, विजय पावडे व शेतकरी उपस्थित होते.
कृषिपंपांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा मिळण्याबाबत शेतकºयांचे निवेदन प्राप्त झाले आहे. याबाबत अहवाल तत्काळ वरिष्ठ कार्यालयात पाठविणार आहे. वरिष्ठांचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना सांगू.
-प्रशांत राठी, कार्यकारी अभियंता
युवासेनेचा उपविभागीय अभियंत्याला घेराव
पोंभूर्णा : महावितरणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी, व्यावसायिक व शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. परतीच्या पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनाही मोटारपंपाने दिवसरात्र पाणी करावे लागत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे पिके करपली जात आहेत. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालु असून वारंवार खंडीत होणाºया विद्युत पुरवठ्याने विद्यार्थीही त्रस्त झाले आहे. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पोंभूर्णा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना सोमवारी घेराव घालत जाब विचारला.
युवासेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व उपजिल्हा प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास युवासेना, शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला. महावितरणच्या वतीने कृषीपंपधारक शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून महावितरण शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी केला आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा हे शासनाचे धोरण आहे. मात्र तालुक्यातील शेकडो शेतकरी यापासून वंचित आहेत. यावेळी विविध समस्या निराकरणासाठी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख सचिन भोयर, उप जिल्हा प्रमुख आशिष कावटवार, शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार आदी उपस्थित होते.