जनआक्रोश क्बल ग्राऊंडवरच, दुसऱ्या मेळाव्याचे स्थळ बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:46 PM2017-11-04T15:46:06+5:302017-11-04T15:46:09+5:30
चंद्रपूर - जनआक्रोश मेळाव्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या आक्रोशामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हा व पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला चांदा क्लब ग्राऊंडची परवानगी दिली असून विदर्भ किसान मजदूर काँग्रेसला मात्र न्यू इंग्लिश हायस्कूलच्या ग्राऊंडची परवानगी नाकारली आहे. विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने आता हा मेळावा इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या मैदानावर घेण्याचे ठरविले आहे. रॅली चंद्रपूर-नागपूर मार्गावरील गौरव लॉन येथून निघणार असून तिचा मार्ग मात्र जनआक्रोशचे आयोजन असलेल्या चांदा क्बल ग्राऊंडपासून जाणारा असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कायम आहे.
पोलीस प्रशासनही या दृष्टीने कामाला लागले असून सर्व तयारीनिशी सज्ज राहणार असल्याची विश्वसनीय माहिती पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. जनआक्रोश मेळाव्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने ३० ऑक्टोबरला आणि विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्यावतीने ३१ ऑक्टोबरला परवानगीसाठी अर्ज केले आहेत. चांदा क्लब ग्राऊंडला परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. आणि न्यु इंग्लिश हायस्कूलच्या ग्राऊंडला परवानगी देण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला असले तरी उपविभागीय अधिकाऱ्यांचे त्यावर शिक्कामोर्तब होणे आवश्यक होते.
दोन्ही ग्राऊंडला परवानगी देण्यासाठी पोलीस प्रशासनाची नाहरकत असावी लागते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभरात जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसने चांदा क्लब ग्राऊंडसाठी सर्वप्रथम अर्ज केला असल्यामुळे या अर्जाला जिल्हा प्रशासनानेही प्राधान्यक्रम दिल्याचे समजते. विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने चांदा क्लब ग्राऊंड लगतच्या न्यु इंग्लिश हायस्कूलच्या ग्राऊंडवर मेळाव्याचे आयोजन केल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वातावरण तापले.
यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे आला. या आधारे विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा नाहरकतसाठीचा अर्ज फेटाळल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. आता विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने मेळाव्याचे स्थळ दाताळा मार्गावरील इंदिरा गांधी गार्डन स्कूलचे ग्राऊंड निवडले असले तरी त्यांची रॅली मात्र नागपूर मार्गावरील गौरव लॉन येथून निघणार आहे. ही रॅली चांदा क्लब ग्राऊंड मार्गे पुढे जाणार आहे. रॅली येथून पुढे जाईपर्यंत पोलिसांसाठी डोकेदुखी आहे. यादृष्टीने पोलीस बंदोबस्त तडगा राहील, शिवाय पोलीस सर्व तयारीनिशी सज्ज राहणार असल्याची माहितीही पोलीस सूत्राने दिली.
परिसराला येणार पोलीस छावणीचे स्वरूप
दोन मेळाव्यामुळे काँग्रेसमधील अतंर्गत वातावरण चांगलेच तापले. दोन्ही मेळाव्यांच्या आयोजनावर पोलीस प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात तडगा पोलीस बंदोबस्त राहणार असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप राहणार असल्याची माहितीही पोलीस सूत्राने दिली.