धक्कादायक! महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरचे विरूर रेल्वे स्टेशन आहे तांदूळ तस्करांचा मोठा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 07:24 PM2022-01-29T19:24:39+5:302022-01-29T19:28:38+5:30
Chandrapur News महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून स्टेशनवर उतरविला जात आहे.
चंद्रपूर : महाराष्ट्रालगतच्या तेलंगणा राज्यातील स्वस्त धान्य दुकानात एक रुपया किलोने मिळणारा तांदूळ पॅकिंग बदलून थेट महाराष्ट्राच्या राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे रेल्वेने पोहोचत आहे. हा तांदूळ रेल्वे गाडीची वाट पाहणारे तस्कर थेट ब्रह्मपुरी, गोंदियासह अन्य भागांत नेऊन त्यावर पुन्हा प्रक्रिया करून जादा दराने विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमधून पुढे आली आहे. विरूर पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना कोणीही याबाबत शंका घेत नाही. पुरवठा विभागही डोळे मिटून असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. या ठिकाणी रेल्वेतून तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून विरुर (स्टे.) येथील रेल्वे स्टेशनवर उतरविला जात आहे. त्या ठिकाणी स्थानिक परिसरातील आठ ते दहा तांदूळ तस्कर आपल्या चारचाकी वाहनाने रेल्वे स्टेशनवर उतरलेला तांदूळ वाहनात भरून गोडाऊनमध्ये नेतात. नंतर हाच तांदूळ ब्रह्मपुरी, गोंदिया येथे जास्त दराने विकला जातो. तिथे या तांदळाला मिलमध्ये पिसून दुसऱ्या पिशवीत भरून लेबल लावून बाजारात जादा दाराने विक्रीला आणला जात आहे. यामध्ये मोठे रॅकेट आहे. हा सर्व प्रकार, रेल्वे प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या डोळ्यांसमोर होत असताना काहीच कारवाई होत नाही. यामागील कारण समजण्यासारखे आहे.
गडचिरोली जिल्ह्यातही होते तस्करी
मंचेरियाल, जयशंकर भोपणपल्ली येथून थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे हा तांदूळ येत आहे. देसाईगंजमार्गे राज्यात हा सरकारी तांदूळ विकला जात आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील पुरवठा अधिकारी हे सतर्क नसल्याने हा कोट्यवधींचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यातील राईस मिल हे मुख्य केंद्र आहे. या राईस मिलमध्ये प्रक्रिया करून भेसळ करून एक रुपया किलोचा तांदूळ पॉलिश करून नवे लेबल लावून भरमसाट दरात विकला जात आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.