नऊ बीडीओंना ‘शोकॉज’
By admin | Published: June 14, 2016 12:28 AM2016-06-14T00:28:15+5:302016-06-14T00:28:15+5:30
वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यालयी गैरहजर राहिल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील नऊ गटविकास ....
नव्या सीईओंचा दणका : विनापरवानगीने मुख्यालयी गैरहजर
चंद्रपूर : वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यालयी गैरहजर राहिल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील नऊ गटविकास अधिकाऱ्यांना नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. त्यांना तीन दिवसांत खुलासा मागितला असून सीईओंच्या या कार्यवाहीने जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
नोटीस बजाविण्यात आलेल्यांमध्ये सिंदेवाही, राजूरा, पोंभुर्णा, नागभीड, बल्लारपूर, गोंडपिंपरी, चंद्रपूर, भद्रावती व मूल या नऊ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. येथील जिल्हा परिषदेत आठ ते दहा दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एम. देवेंदर सिंग रूजू झाले. रूजू होताच त्यांनी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छ प्रशासन व कर्तव्यदक्षतेने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नियमानुसार काम करा, अन्यथा कार्यवाहीला समोर जा, असे त्यांनी बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना बजावले होते.
११ जूनला मुख्य कार्यकारी अधिकारी सिंग यांनी विविध पंचायत समिती व अधिनिस्त प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देण्यासाठी गेले. मात्र या भेटीत सिंदेवाही, राजूरा, पोंभुर्णा, नागभीड, बल्लारपूर, गोंडपिंपरी, चंद्रपूर, भद्रावती व मूल अशा तब्बल नऊ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुख्यालयी गैरहजर आढळून आले.
मुख्यालय सोडत असताना वरिष्ठांना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. परंतु, नऊही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. याबाबत अधिक चौकशी केली असता, काही जण नागपूर, जबलपूर व इतर ठिकाणी गेल्याचे कळले.
त्यामुळे वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यालय सोडल्याच्या कारणावरून नवही गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. सर्वांना पुढील तीन दिवसांत नोटीसचे उत्तर मागितले असून या प्रकारामुळे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)
मुख्यालय सोडताना वरिष्ठांना सूचना देणे क्रमप्राप्त आहे. मात्र नवही गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्यालय सोडले. त्यामुळे त्यांना नोटीस बजावून तीन दिवसांत लेखी खुलासा मागितला आहे.
- एम. देवेंदर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर.