गोळीबार करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:40+5:302021-05-17T04:26:40+5:30

वरोरा :येथील आबिद शेख या युवकाची शनिवारी रात्रीच्या सुमारास तिघांनी गोळीबार करून हत्या केली. त्यानंतर मारेकरी फरार झाले. मारेकऱ्यांना ...

The shooters were handcuffed by the local crime branch within 24 hours | गोळीबार करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत ठोकल्या बेड्या

गोळीबार करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत ठोकल्या बेड्या

Next

वरोरा :येथील आबिद शेख या युवकाची शनिवारी रात्रीच्या सुमारास तिघांनी गोळीबार करून हत्या केली. त्यानंतर मारेकरी फरार झाले. मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक करीत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृताच्या कुटुंबीयांनी घेतली. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे सोपविली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत मारेकऱ्यांना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील जंगलातून ताब्यात घेतले. देवा नौकरकर, गौरव वाळके अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत.

पंचायत समिती कार्यालयानजीक अंबादेवी वॉर्ड रोडलगत एका टिनाच्या शेडमध्ये आबिद शेख हा आपल्या काही सहकाऱ्यासह बसला होता. त्याचदरम्यान देवा नौकरकर, गौरव वाळके हे दोघे आपल्या सहकाऱ्यासह तोंडाला रुमाल बांधून दुचाकी वाहनाने तेथे आले. आबिद शेख याच्यावर गोळीबार करून निघून गेले. यात आबिद शेख हे गंभीररित्या जखमी झाले. मारेकऱ्यांनी हत्येसाठी वापरलेली बंदूक शेख याच्या शरीरावर ठेवून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर वरोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून एक बंदूक, एक दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. जखमी अवस्थेत आबिद शेख याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. तब्बल २० तासांनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

बॉक्स

रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकांची गर्दी

घटनेची माहिती मिळताच मृताचे कुटुंबीय, नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविली.

बॉक्स

आरोपीच्या शोधार्थ सहा पथके

एलसीबीचे तीन, वरोरा, भद्रावतीचे प्रत्येकी एक पथक आणि सायबर सेलचे एक पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले. एलसीबीच्या पथकाने वरोऱ्यातील दोन युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी ते दोघे मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात असल्याचे समोर आले. सायबर सेलने मुख्य आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. यात देवा नौकरकर, गौरव वाळके हे दोघे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहेरीच्या दिशेने रवाना झाले. अहेरी जंगल परिसरात शोध मोहीम राबवून लपून बसलेल्या देवा नौकरकर, गौरव वाळके या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

कोट

गोळीबार करून युवकाची हत्या झाली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अहेरी जंगलातून दोन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पथकातील कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून ही कारवाई केली.

- बाळासाहेब खाडे,

पोलीस निरीक्षक, एलसीबी, चंद्रपूर

Web Title: The shooters were handcuffed by the local crime branch within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.