बल्लारपूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात नकाबधारी युवकांनी गोळ्या झाडून केली इसमाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 03:17 PM2020-08-08T15:17:27+5:302020-08-08T16:35:23+5:30
बल्लारपूर शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात शनिवारी दुपारी २ च्या सुमारास सूरज बहुरीया या इसमावर दोन दुचाकीने आलेल्या दोन युवकांनी गोळीबार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात एका दुचाकीने आलेल्या दोन नकाबधारी अज्ञात युवकांनी जवळ असलेल्या पिस्तूलातून येथीलच सूरज बहुरीया यांच्यावर गोळीबार केला. ही थरारक घटना शनिवारी दुपारी 2.34 वाजताच्या सुमारास घडली. नकाबधारी युवकांनी पिस्तूलातून एकूण सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या सूरज बहुरीया यांना लागल्या. घटनेनंतर लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चंद्रपूरला हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपी ज्या दिशेने पळाले. त्या मागावर पोलीस शोध घेत आहे. या घटनेने बल्लारपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची वार्ता बहुरीया यांच्या समर्थकांपर्यंत पोहचताच ते चांगलेच बिथरले असल्याचे समजते. बहुरीया परिवार बल्लारपूर वेकोलिच्या काटागेटजवळ राहतात. या भागात तणावाची स्थिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, सूरज बहुरीया हे बामणीहुन बल्लारपुरात कारने परत येत होते. अश्यातच जुन्या बसस्थानक परिसरात भेंडे नाल्याच्याजवळ अचानकपणे दोन नकाबधारी युवक दुचाकीने येऊन बहुरीया यांची कार अडवली. त्यांनी बहुरीया यांना कारच्या काचा खाली उतरवायला सांगितल्या. बहुरीया यांनी त्यांचे ऐकले नाही. अशातच त्या युवकांनी बहुरीया यांच्या दिशेने कारच्या काचावर बेछूट गोळीबार केला. यातील तीन गोळ्या बहुरीया यांच्या शरीरात घुसल्या. सूरज बहुरीया यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी शहरात फलक लावले होते.