मासळ बु येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:28 AM2021-04-04T04:28:35+5:302021-04-04T04:28:35+5:30
छायाचित्र : मागील तीन वर्षांपासून बंद अवस्थेतील जलशुध्दीकरण सयंत्र. मासळ बु : चिमूर तालुक्यापासून ११ किलोमीटरवरील ताडोबा अंधारी व्याघ्र ...
छायाचित्र : मागील तीन वर्षांपासून बंद अवस्थेतील जलशुध्दीकरण सयंत्र.
मासळ बु : चिमूर तालुक्यापासून ११ किलोमीटरवरील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या आदर्श ग्रामपंचायत मासळ बु. येथील दोन्ही जलशुद्धीकरण संयंत्र निष्क्रिय झाल्याने गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून सन २०१४-१५ मध्ये मासळ येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून स्थानिक ग्रामपंचायतच्या पटांगणात जलशुद्धीकरण संयंत्र बसविले. विधान परिषद सदस्य माजी आमदार मितेश भांगडिया यांच्या स्थानिक विकास निधीतून सन २०१४- १५ ला गावालगत नंदारा रोडवरील अंगणवाडी क्र. ३ जवळ दुसरे जलशुद्धीकरण सयंत्र बसविले. मात्र, हे जलशुद्धीकरण सयंत्र मागील ३ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या सयंत्राला दुरुस्त करण्याची प्रक्रिया राबविली नाही. ग्रामपंचायत पटांगणातील जलशुद्धीकरण सयंत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही जलशुद्धीकरण सयंत्र बंद अवस्थेत आहेत. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावकरी गावाबाहेरील करबडा फाटा, कोलारा फाटा येथून हातपंपाचे पाणी मोटारसायकलने आणताना दिसत आहेत. गावकऱ्यांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाप्रति रोष निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तात्काळ दोन्ही जलशुध्दीकरण सयंत्र दुरुस्त करावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायत मासळ बु.च्या मालकीचे पाण्याचे स्त्रोत
१२ हातपंप असून एकही हातपंप पिण्यायोग्य पाण्याचा नाही. ५ विहिरी असून फक्त एकच विहीर पिण्याचे पाणी वापरण्यायोग्य आहे. गावात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. त्यातच उन्हाळा लागण्यापूर्वी गावातील विहिरीने तळ गाठल्याने गावात मोठे जलसंकट निर्माण होईल.
गावात नळयोजना असून मागील अनेक दिवसांपासून नळयोजनेचे पाणी एक दिवसाआड मिळत आहे. तेही पाणी पिण्यायोग्य नाही.
गावालगत ग्रामपंचायतची मालकी जागा उपलब्ध नसल्याने गावालगत ६ खासगी विहिरी आहेत. त्या विहिरीचे पाणी गावातील काही नागरिक आणत असतात.
सोबत दोन फोटो.. १. पहिला फोटो.
जाहीर मुनारी दिल्यानंतर जलशुद्धीकरण यंत्रावर उसळलेली गर्दी २. दुसरे छायाचित्र
मागील तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले जलशुध्दीकरण सयंत्र.