आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:53 PM2018-11-02T22:53:22+5:302018-11-02T22:54:14+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंदात औषधांचा पुरवठाच नसल्यामुळे रुग्णालयात औषधांसाठी हाहाकार माजला आहे. परिणामी रुग्णांना खासगी औषध भंडारमधून औषधांची खरेदी करावी लागत आहे. यात गोरगरीब रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
परीमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंदात औषधांचा पुरवठाच नसल्यामुळे रुग्णालयात औषधांसाठी हाहाकार माजला आहे. परिणामी रुग्णांना खासगी औषध भंडारमधून औषधांची खरेदी करावी लागत आहे. यात गोरगरीब रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी जि. प. अंतर्गत तालुका स्तरावर व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपक्रेंद, ग्रामीण रुग्णालय चालविण्यात येतात. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात या आरोग्य केंद्रात उपचार घेतात. मात्र जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात अल्प प्रमाणात औषधांचा पुरवठा झाल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवसेंदिवस ती वाढतच आहे.
मात्र आरोग्य केंद्रात सध्या तापावरील पॅरासिटामोल, डायक्लोफेन्याक, अॅसेक्लोफेन्याक, बुरफेन तर प्रतिजैविकांमध्ये सिपरोफ्याकझिन, नॉनफ्लाक, लहान मुलांच्या सर्दीवरील औषध, खोकल्याचे औषध, खाजेसाठी असणारे अव्हील अशा अनेक औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. शिवाय सर्पदंशावरील इंजेक्शनचाही तुटवडा आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातही ठणठणाट
चंद्रपूर येथे मेडिकल कॉलेज सुरु झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र येथील रुग्णालयातसुद्धा अपुऱ्या औषधसाठ्यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधांची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
रुग्णांचा डॉक्टरांवर रोष
वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या औषध आवश्यक्तेनुसार रुग्णांना देत असतात. मात्र रुग्णालयातच औषध उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना खासगी औषध भांडारातून औषध खरेदी करावी लागते. त्यामुळे अनेक रुग्ण सबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर रोष व्यक्त करीत असतात.
आता डीपीसी फंडातून होणार खरेदी
पूर्वी हापकिन इन्स्ट्टियूटतर्फे औषध खरेदी करण्यात येत होती. मात्र या इन्स्ट्टियूटने अल्प प्रमाणात औषध खरेदी करुन त्याचा पुरवठा आरोग्य केंद्रांना केला. त्यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधांची खरेदी करावी लागत आहे. मात्र आता शासनाने औषध खरेदीचा अधिकार जिल्हा परिषदला दिला असून डीपीसी फंडातून औषधी खरेदी करण्यात येणार आहे.
आरोग्य केंद्रात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध आहे. तसेच शासनाने आता डीपीसी फंडातून औषध खरेदीचे अधिकार दिल्याने लवकरच औषध खरेदी करण्यात येणार आहे.
- प्रकाश साठे,
जिल्हा आरोग्य अधिकारी