रेनवाटर हार्वेस्टिंग सोबत शोषखड्डाही महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:42 AM2019-07-11T00:42:36+5:302019-07-11T00:43:06+5:30
शहरात इको-प्रो च्या माध्यमाने सुरु असलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंग जनजागृती अभियान सोबत आता शोषखड्ड्यासाठी सुद्धा जनजागृती केली जात आहे. याला नागरिकही चांगला प्रतिसाद देत असून भविष्यात फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात इको-प्रो च्या माध्यमाने सुरु असलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंग जनजागृती अभियान सोबत आता शोषखड्ड्यासाठी सुद्धा जनजागृती केली जात आहे. याला नागरिकही चांगला प्रतिसाद देत असून भविष्यात फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आज प्रत्येक घरी बोरवेल, विहीरीच्या माध्यमातून पाण्याचा प्रचंड उपसा केला जातो. मागील अनेक वर्षांपासून सातत्याने हेच सुरुच आहे, पुढेही असेच सुरु राहील तर भविष्यात पाण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकणार आहे. यासाठी प्रत्येकाने भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी पावसाचे पाणी विहीरीत किंवा बोरवेलमधे पुनर्भरण करण्यास रेनवाटर हार्वेस्टिंग एक पर्याय आहे. तर दुसरा पर्याय प्रत्येक घरातील सांडपाणी नालित वाहू जाऊ न देता त्याचे सुद्धा शोषखड्डा करून सांडपाणी जमिनीत मुरविता येते. यासाठी मागील काही दिवसांपासून इको-प्रो जनजागृती करीत आहे. या अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद असून रेनवाटर हार्वेस्टिंग व शोषखड्डा तयार करण्यास ते पुढे येत आहेत. ५ जून पासून इको-प्रोतर्फे सुरु करण्यात आलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियानाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात जनजागृती केली जात आहे. या अंतर्गत शहरात काही नागरिकांनी दोन्ही प्रकारे पावसाचे आणि सांडपाणी जमिनीत मुरविण्यासाठी दोन टाके सुद्धा तयार केले आहे. भविष्यात चंद्रपूरातील रेनवाटर हार्वेस्टिंग अन्य शहारीतल नागरिकांकरिता पथदर्शक ठरले, असा विश्वास इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी व्यक्त केला आहे.
शोषखड्डा
शोषखड्डा म्हणजे, घरातील सांडपाणी घर-परिसरात जिरविण्याकरिता केलेला खड्डा. प्रत्येक घरातील स्वयंपाकघर, बाथरूम, कपड़े धुण्याचे पाणी व इतर सांडपाणी नालीत न सोडता एका खड्यात विटाचे जाळीदार विटाचे बांधकाम करून टाकावे.
शोषखड्ड्याची आवश्यकता का?
आज एका घराची पाण्याची गरज सरासरी १ हजार लीटर प्रतिदिवस अशी आहे. वार्षिक पाण्याची गरज ही ३ लाख ६५ हजार इतकी असते, म्हणजे, सरासरी प्रति परिवार वार्षिक पाण्याची गरज ४ लाख लीटर इतकी असेल तर त्या घरी रेनवाटर हार्वेस्टिंग केले तरी एकूण वापराच्या केवळ १० ते २० टक्केच पाणी जमिनित पुनर्भरण करू शकतो. १००० चौ. फुट छतावरुन १ लाख लीटर पाणी एका ऋतुत पुनर्भरण होईल. मात्र उपसा ४ लाख लीटर असेल आणि पुनर्भरण १ लाख लीटर असे प्रमाण. तेव्हा प्रत्येक घरातून वाहून जाणारे सांडपाणी सुद्धा शोषखड्ड्यामधे जिरविता आल्यास हे प्रमाण बरोबर राखता येईल. त्याकरिता घर तिथे रेनवाटर हार्वेस्टिंग आणि शोषखड्डा हे दोन्ही आवश्यक आहे.
रेनवाटर हार्वेस्टिंग
घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी छतावरुन पाईपची जोङणी करून बोरवेल किंवा विहिरिजवळ एक फिल्टर टाकी तयार करून त्यात सोडले जाते. हे पाणी शुद्ध होऊन विहिरित, बोरवेलमध्ये जाते.अशा पद्धतीने रेनवाटर हार्वेस्टिंग केले जाते. येथे मात्र फिल्टर टाकीला महत्त्व आहे, या टाकीत दगड, गिट्टी लहान-मोठी, रेती-बदरी, कोळसा याचा वापर केला जातो. या टाकीचे बांधकाम पक्के विटाचे केल्यास चांगले असते.