संपामुळे दोन दिवसांत एक कोटींचा फटका
By admin | Published: July 28, 2016 01:27 AM2016-07-28T01:27:14+5:302016-07-28T01:27:14+5:30
शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनी....
अडते-व्यापाऱ्यांचा संप : शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
चंद्रपूर : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून संप सुरू केला आहे. हा संप बुधवारीही सुरू होता. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गोची झाली असून माल विकायचा कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान संपामुळे दोन दिवसांत जवळपास १ कोटी रूपयाची उलढाल थांबल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
संपामुळे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह गंज वॉर्डातील भाजी बाजारात शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे ग्राहकांचीही मोठी पंचाईत झाली आहे. भाजीपाल्याचे दर दुप्पटीने वधारले असून ठोक भावात माल विकणारे शेतकरी चिल्लर विक्री करण्यास नकार देत आहेत. परिणामी भाजीपाल्याची नियमीत विक्री करणारे चिल्लर भाजीविक्रेते गल्लोगल्ली फिरून दामदुप्पट दराने भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. व्यापाऱ्यांकडून अडत कापण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनीही संप सुरू केला आहे. या संपात बाजार समितीचे ६९ भाजीपाला अडते व फळांचे ३४ अडते असे १०३ तर १२७ व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सायंकाळी व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. मात्र तोडगा निघू शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
भाजीपाल्याचे भाव दुप्पट
व्यापाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांच्या मालाची ठोक विक्री थांबली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव दुप्पट वाढले असून दोन दिवसांपुर्वी टमाटर ३० रूपये किलो होते. संपामुळे हातठेलेवाले टमाटर ५० रूपये किलो, मिरची १०० रूपये, पत्ता कोबी ६० रूपये, कारली १२० रूपये, ढेमसे ६० रूपये, वांगे ८० रूपये, बटाटे ५० रूपये, कोहळा ५० रूपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.