आमचे तरुणपण पोलीस भरतीच्या तयारीतच घालवायचे का? सोशल मीडियावर व्यक्त होतोय रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 04:59 PM2022-11-03T16:59:32+5:302022-11-03T17:43:26+5:30
पोलीस भरती रद्द झाल्याने नाराजी
चंद्रपूर : तीन वर्षांनंतर होऊ घातलेली पोलीस भरती राज्य शासनाने पुढे ढकलली. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. एकतर तीन वर्षांनंतर भरती काढली. त्यातही प्रशासकीय कारण पुढे करत ती भरती समोर ढकलली. असेच सुरू राहिल्यास आम्ही आयुष्यभर पोलीस भरतीची तयारी करायची काय, असा प्रश्न तरुण युवक सरकारला सोशल मीडियावर विचारताना दिसून येत आहेत.
पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेकजण मागील काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. परंतु, तीन वर्षांपासून भरती झालीच नाही. नुकतीच जाहिरात प्रसिद्ध होताच ती भरती रद्द करण्यात आली. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची निराशा झाली आहे. पुन्हा किती दिवस तयारी करावी लागणार असा प्रश्न ते सरकारला विचारत आहेत.
पोलीस भरती पुढे ढकलली
- राज्यात २० हजार पदांसाठी पोलीस भरती होणार होती. तशा सूचना पोलीस महासंचालकांकडून पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या होत्या.
- परंतु, सरकारने प्रशासकीय कारण पुढे करून भरती पुढे ढकलली आहे.
जिल्ह्यात १९४ पदांसाठी होणार भरती
राज्यात वीस हजार पदांची भरती होणार होती.
चंद्रपूर जिल्ह्यात १९४ पदांसाठी भरती होणार होती.
परंतु, आता पोलीस भरतीच रद्द झाल्याने तरुणांचा हिरमोड झाला आहे.
पोर पोलीस व्हावं म्हणून किती वर्षे खर्च करायची?
पोराला पोलीस बनायचं आहे. भरतीची तयारी करतो अन् शिकवणी लावतो. म्हणून पोरगा तीन वर्षांपासून चंद्रपूरला राहतो. पण भरतीच निघत नाही. हातावर आणून पोटावर खाण्याची परिस्थिती आहे.
- संगम रायपुरे, पालक
पोराची पोलीस भरतीची तयारी चांगली व्हावी, म्हणून त्याला अकादमीमध्ये टाकले. परंतु, भरतीच निघेना. भरतीच्या प्रतीक्षेत वय वाढत आहे. किती दिवस पैसे पुरवायचे.
- जितेंद्र सायमवार, पालक
चार वर्षांपासून तयारी करतोय, पुढे काय?
पोलीस बनण्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. शारीरिक क्षमता चाचणी व पेपरचा अभ्यास करीत आहे. पण भरतीच निघत नसल्याने काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वय वाढत चालले आहे. परंतु, सरकार भरती प्रक्रिया राबवत नाही.
- प्रफुल्ल गोंगले
आई-वडील मुलगा पोलीस बनेल असे स्वप्न बघत आहेत. ते पूर्ण करण्यासाठी कठोर प्रयत्न करीत आहेत. पण भरतीच निघत नसल्याने किती दिवस भरतीची तयारीच करावी लागणार काही कळेनासे झाले आहे. भरतीची माहिती मिळताच घरी कळविले. आता भरती निघाली. तुमचे स्वप्न पूर्ण करेल. पण दुसऱ्याच दिवशी भरती रद्द झाल्याचे कळवावे लागले.
- सयम मडावी