पाणीटंचाई व डासमुक्तीसाठी श्रमदान
By admin | Published: June 5, 2017 12:23 AM2017-06-05T00:23:58+5:302017-06-05T00:23:58+5:30
तालुका वरोरा येथील सातारा गावात मागील कित्येक वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना भर उन्हात पाण्याकरिता पायपीट करावी लागत आहे.
स्तुत्य उपक्रम : शासकीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : तालुका वरोरा येथील सातारा गावात मागील कित्येक वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना भर उन्हात पाण्याकरिता पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे गावातच शोषखड्डे प्रत्येक घरात तयार करून पाणी जमिनीत मुरविण्याकरिता वरोरा तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदान करणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सातारा गावातील जमिनीच्या पाण्याची पातळी वाढुन गाव पाणी टंचाई व डासमुक्त होईल, असा निर्धार व्यक्त करीत श्रमदानाला प्रारंभ करण्यात आला. अशाप्रकारे श्रमदान हा जिल्ह्यातील पहिला प्रयोग असल्याचे मानले जात आहे.
वरोरा तालुक्यातील सातारा गावाची लोकसंख्या १४५ असून ४५ कुटुंब आहे. उन्हाळा सुरू होताच सातारा गावात पाणी पाठविण्याकरिता प्रशासनाच्या बैठका सुरू होते. गावात दोन विहिरी आहे. त्या उन्हाळ्यात कोरड्या पडत असल्याने ग्रामस्थांना तीन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत असते. सातारा छोटस गाव आहे. त्यामुळे हे गाव पाणी टंचाईमुक्त कसे होणारश, याकरिता आ. बाळु धानोरकर यांनी पुढाकार घेतला. शासकीय योजनेतून कुपनलिका, टँकरने विहीरीत पाणी सोडणे या उपाययोजना सुरू आहे. परंतु त्या तात्पुरत्या असल्याने कायमस्वरूपी मात करण्याकरिता आ. धानोरकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. सातारा गाव पाणी टंचाईमुक्त करण्याकरिता वरोराचे संवर्ग विकास अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी श्रमदान करण्याचे सूचविले. अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ प्रत्येक घरी शोषखड्डा तयार करतील. छतावर पडणारे पाणी, भांडी धुण्याचे पाणी अडविण्याकरिता पुढाकार घेतला व पावसाळ्यापूर्वीच शोषखड्डे खोदण्याच्या कामाला आ. बाळु धानोरकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, उपविभागीय कृषी अधिकारी एस.बी. राजवाडे, तालुका कृषी अधिकारी व्ही.आर. प्रकाश, संवर्ग विकास अधिकारी सुदर्शन तुपे, सहायक संवर्ग विकास अधिकारी बोबडे, सरपंच जयश्री ढोक, उपसरपंच राजकुमार ऐकुडे, बाजार समिती सभापती विशाल बदखल, उपसभापती राजु चिकटे, बाजार समिती संचालक दत्ता बोरेकर, योगेश खामनकर, बंडु शेळके, देवानंद मोरे, राजु आसुटकर, भलमे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी सातारा गावात प्रत्येक घरासमोर दोन वृक्ष लावून वृक्षारोपणाला प्रारंभही करण्यात आला. गावालगतचा नाला खोलीकरण करून त्या नजीकच्या विहिरीमध्ये पावसाचे पाणी शास्त्रीयदृष्ट्या शुद्धीकरण करून टाकण्यात येणार आहे. शोषखड्डा ४ बाय ४ फुट खोल करण्यात येणार आहे. यामुळे गावातील संपुर्ण पावसाळ्याचे पाणी व भांडी धुणी करणारे पाणी जमिनीत मुरविण्यात येणार आहे.
गावकरी खोदणार शेततळे
पावसाळ्याचे पाणी जमिनीत झिरपले पाहिजे, त्याचा फायदा रब्बी पिकांनाही होतो व जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. याकरिता प्रत्येक शेतकऱ्याने शेतात शेततळे खोदण्यासाठी होकार दिला. त्यामुळे सातारा गावात येत्या काही महिन्यात ज्या व्यक्तीच्या नावे शेती आहे. तिथे शेततळे होणार आहे. याची माहिती संकलन करण्याचा सुचना उपविभागीय कृषी अधिकारी एस.बी. राजवाडे यांनी कृषी कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यामुळे सातारा गाव भविष्यात सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित मानले जात आहे.
पाणी दान
करणाऱ्यांचा सत्कार
सातारा गावात पाणी टंचाई असल्याने नागरिकांना पाण्याकरिता पायपीट करावी लागत होती. ग्रामस्थांची केवलवाणी धडपड गावातील जीवतोडे नामक शेतकऱ्यास बघविली नाही. जीवतोडे यांनी आपल्या गावालगतच्या विहीरीतून पाईपलाईनने पाणी सोडण्याकरिता होकार दिला. कुठलाही मोबदल्याची अपेक्षा जीवतोडे यांनी ठेवली नाही. त्यामुळे जीवतोडे यांचे पाणीदानाचे कार्य महान असल्याने आ. बाळु धानोरकर व उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांनी त्यांचा सत्कार केला.