मोकळ्या जागांवर झुडपांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 09:55 PM2019-08-11T21:55:33+5:302019-08-11T21:56:34+5:30
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसामुळे शहरातील मोकळ्या जागांमध्ये, घराभोवतालच्या जागेवर, घरासमोरील पटांगणात अनावश्यक झुडुपे व गवत वाढले आहे. या अनावश्यक झाडेझुडुपांमध्ये साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता असून एखादी दुर्घटनाही घडू शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसामुळे शहरातील मोकळ्या जागांमध्ये, घराभोवतालच्या जागेवर, घरासमोरील पटांगणात अनावश्यक झुडुपे व गवत वाढले आहे. या अनावश्यक झाडेझुडुपांमध्ये साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता असून एखादी दुर्घटनाही घडू शकते. मात्र या अनावश्यक गवत व झाडेझुडुपा महानगरपालिका प्रशासन गोंजारत बसल्याचे दिसून येते. नागरिकांनी तक्रारी करूनही सफाई कर्मचारी नकार देत असल्याने हा कचरा आणखी वाढत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
आॅगस्ट महिन्याचा पहिला पंधरवाडा सुरू आहे. या महिन्यात चंद्रपूर शहरात बºयापैकी पाऊस झाला. जुलै महिन्यातही पाऊस आला होता. या पावसामुळे चंद्रपुरातील अनेक मोकळ्या जागांवर अनावश्यक झुडुपे, गवत वाढले आहे. घराच्या शेजारी, पटांगणातही हा हिरवा कचरा वाढला आहे. चंद्रपुरातील अनेक वसाहतीमधील घरांकडे जाण्यासाठी पायवाट आहे. ही पायवाटही या कचºयाने गिळंकृत झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास अशा वाटेने जाताना साप, विंचूवर पाय तर पडणार नाही ना, अशी भीती नागरिकांना असते. महानगरपालिकेचे सफाई कामगार महिन्यातून, काही ठिकाणी दोन महिन्यातून एकदा नाल्यांचा उपसा करायला येतात. नाल्यांचा उपसा केल्यानंतर हे सफाई कामगार केवळ नाल्यांच्या काठावरील गवत व अनावश्यक झाडे तोडतात. मात्र घराच्या सभोवताल असलेले गवत, पटांगणातील हिरवा कचरा साफ करीत नाही. घरातील लोकांनी आर्जव केली तरी हे सफाई कामगार ‘आमचे हे काम नाही’, असे सांगत याकडे दुर्लक्ष करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने मोकळ्या जागांवरील, पटांगणावरील व घराच्या भोवताली असलेल्या या झुडुपांमध्ये साप, विंचू यासारख्या विषारी सरपटणाºया प्राण्यांचा वावर असू शकतो.
मनपाकडून अपेक्षा
महानगरपालिका प्रशासनाने आपल्या सफाई कामगारांच्या माध्यमातून शहरातील विविध घराशेजारी व पटांगणात असलेले अनावश्यक झाडे, गवतांवर फावडा चालवून ते साफ करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मनपाने आजवर ही मोहीम राबविली नाही. मात्र यावेळी मनपाने ही मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डासांचा प्रचंड प्रादुर्भाव
शहरातील मोकळ्या जागा, रिकामे प्लॉट्स यामध्ये झाडेझुडुपे तर आहेच. शिवाय खोलगट भागात पावसाचे पाणीही साचून आहे. त्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या डासांचा त्या परिसरातील लोकांना मोठा त्रास होत आहे. डासांमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारालाही आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.