बल्लारपुरात पाडले जातात हिऱ्यावर पैलू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:58 PM2018-03-09T23:58:11+5:302018-03-09T23:58:11+5:30
हिऱ्याचे आकर्षण सर्वांनाच आहे. यामुळे हिरे ज्वेलरी उद्योगाने मोठी भरारी घेतली आहे. आयात केलेला कच्चा हिरा, त्याला आकर्षक रूप व आकार देणारे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरू करण्यात आले.
अनेकश्वर मेश्राम।
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : हिऱ्याचे आकर्षण सर्वांनाच आहे. यामुळे हिरे ज्वेलरी उद्योगाने मोठी भरारी घेतली आहे. आयात केलेला कच्चा हिरा, त्याला आकर्षक रूप व आकार देणारे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरू करण्यात आले. डायमंड उद्योग क्षेत्रात कारागिरांना रोजगाराची संधी मिळावी, हा हेतू आहे. याच अनुषंगाने बल्लारपूर येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी कारागीर हिºयावर पैलू पाडत आहेत.
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व गुजरात राज्यातील एन.डी. जेम्स कंपनी अंतर्गत आगामी तीन वर्षांसाठी हिरे ज्वेलरी क्षेत्रात किमान तीन हजार कारागीर उपलब्ध करण्याचा सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार बल्लारपूर येथील दादाभाई पाईप कंपनीच्या परिसरात डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहे. त्यांच्या हस्ते ११ फेब्रुवारीला सदर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनदेखील करण्यात आले.
गुजरात राज्यातील सुरत येथील एन.डी. जेम्स कंपनी कच्चा हिरा आयात करतो. येथील प्रशिक्षण केंद्रात हिऱ्यावर मार्कलिंग व क्लिचिंग करून चार प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून मशीनवर कटींग केला जातो.
यामध्ये टेबल, बॉटम, आयानेल व मथडा डायमंड कटींगचा समावेश आहे. सदर प्रक्रियेनंतर डायमंड एन.डी. जेम्स कंपनीकडे पाठविला जातो. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कारागिरांना नव्या तंत्रज्ञानाचे आकलन व्हावे, हिरे ज्वेलरीमधील डिझायनिंग कौशल्य प्राप्त व्हावे म्हणून भर दिला जात आहे.
दोन तुकड्याच्या माध्यमातून एक हजारांना प्रशिक्षण
डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्रात एका मशिनवर चार कारागिरांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. १ ते २० तुकडीमागे प्रत्येकी ३० प्रशिक्षणार्थी असे एकाच वेळी एकूण ५०० तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. सदर प्रशिक्षणाचा एकूण कालावधी ८०० तासांचा म्हणजेच चार महिन्यांचा आहे. येथे दोन तुकड्यांच्या माध्यमातून प्रत्येकी ५०० प्रमाणे एक हजार तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थ्यांना नि:शुल्क भोजन व निवास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे युवकांचाही या प्रशिक्षणाकडे कल वाढत आहे.
प्रशिक्षणार्थ्यांना दिली जाणार रोजगाराची हमी
भारताला सर्वात जास्त परदेशी चलन डायमंड उद्योग क्षेत्रातून मिळते. जगातील १० पैकी ८ हिरे भारतात बनविले जातात. त्याची निर्यात परदेशात केली जाते. या क्षेत्रात गुजरात राज्य आघाडीवर आहे. राज्यात हिरे ज्वेलरी क्षेत्रात प्रशिक्षित कारागिराचे प्रमाण अल्प आहे. यामुळे येथील प्रशिक्षणार्थ्यांना डायमंड उद्योग क्षेत्रात हमखास रोजगार मिळणार आहे. येथील प्रशिक्षणार्थी हिरे ज्वेलरी क्षेत्रात महिन्याला १५ ते २० हजार रुपये कमवणारा ठरणार आहे. ही रोजगाराची एकप्रकारे हमी आहे.
अद्यावत प्रशिक्षण केंद्र
हिरे ज्वेलरी क्षेत्राची आर्थिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे. यामधील डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग व मार्केटींगचे जाळे आर्थिक विकासाला चालना देणारे आहे. मेक इन इंडिया कल्पनेला हातभार लावणारे आहे. या क्षेत्राला राज्यात झळाळी प्राप्त करून देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र मोलाची भूमिका पार पाडणारे आहे. यामुळे एन.डी. जेम्स कंपनीने अद्यावत नव्या तंत्रज्ञानाच्या मशीन उपलब्ध केल्या आहेत. हिºयावर पैलू पाडण्याचे गुण आत्मसात करण्याची संधी प्रशिक्षणार्थ्यांना दिली आहे. यातून कुशल कारागीर बाहेर पडतील. डायमंड क्षेत्रात नावलौकिक मिळवतील, असा आशावाद येथील व्यवस्थापक निलेश गुल्हाने यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केला.