उड्डाण पुलासाठी स्वाक्षरी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:32 PM2017-12-10T23:32:52+5:302017-12-10T23:33:30+5:30
एखाद्या कामाचे भूमिपूजन चारदा करुनसुद्धा कामाला सुरुवात करण्यात आली नाही. जगातली ही दुर्मिळ घटना आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर: एखाद्या कामाचे भूमिपूजन चारदा करुनसुद्धा कामाला सुरुवात करण्यात आली नाही. जगातली ही दुर्मिळ घटना आहे. म्हणून येथील लोकप्रतिनिधींचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात यावे, यासाठी स्वाक्षरी अभियान तथा प्रतिकात्मक सत्कार कार्यक्रम, अशा प्रकारचे अभिनव आंदोलन शिवसेनेचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख व उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यांच्याशी प्रताडना केल्याचा आरोप आ. बाळू धानोरकर यांनी यावेळी केला. ५० ते ६० हजार लोकवस्ती असलेल्या बाबुपेठच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या निधीची तरतूद आणि नियोजन नसताना चारदा भूमिपूजन करुन लोकप्रतिनिधींनी बाबुपेठकरांच्या भावना दुखावल्या आहेत. लोकप्रतिनिधींच्या या कार्याची दखल गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने घ्यावी, यासाठी हे आमचे आंदोलन होते, असे यावेळी किशोर जोरगेवार यांनी सांगितले. त्यानंतरही पुलाचे बांधकाम सुरु न केल्यास आम्ही दर तीन महिन्यांनी या विषयासाठी आंदोलन करु, असा इशारा जोरगेवार यांनी दिला.
या आंदोलनचे प्रास्ताविक शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी केले. जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारती दुधानी, शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश नायडू, वंदना हातगावकर, दुर्गा वैरागडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लोकप्रतिनिधींचा प्रतिकात्मक स्वरुपात सत्कार करण्यात आला.