सदस्यही नसताना सचिव म्हणून स्वाक्षऱ्या
By admin | Published: July 23, 2016 01:38 AM2016-07-23T01:38:46+5:302016-07-23T01:38:46+5:30
प्रतापसिंग शिक्षण संस्था, पिपर्डाद्वारा संचालित आदिवासी आश्रमशाळा कवठाळा, नांदगाव, चंदनवाही, जिवती व कोर्टामक्ता ...
प्रतापसिंग शिक्षण संस्थेचा प्रताप : पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
कोरपना : प्रतापसिंग शिक्षण संस्था, पिपर्डाद्वारा संचालित आदिवासी आश्रमशाळा कवठाळा, नांदगाव, चंदनवाही, जिवती व कोर्टामक्ता या सर्व आश्रमशाळांना शासनाकडून दरवर्षी अनुदान मिळते. संस्था सचिवाच्या मृत्यूनंतर २०१५-१६ या सत्राचे शासनाकडून मिळालेले सर्व अनुदान संस्थेचा सदस्यही नसताना सचिव म्हणून स्वाक्षऱ्या करून पिंक्लेश्वर राठोड या व्यक्तीने उचलल्याची गंभीर बाब माहिती अधिकारातून उजेडात आली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे, पिंक्लेश्वर राठोड हा संस्थेचे मृत सचिव सुधाकर राठोड यांचा मुलगा आहे. सद्यस्थितीत संस्थेतील ११ पैकी पाच सदस्यांचा मृत्यू झालेला आहे. संस्थेच्या प्राथमिक सदस्यांनी धमार्दाय आयुक्ताकडे कसल्याही प्रकारचा बदल अर्ज दिला नसताना पिंक्लेश्वर राठोड यांना एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून संस्थेचे लाखों रुपयाचे अनुदान बनावट सहीच्या आधारे दिले कसे, असा सवाल संस्थेचे प्राथमिक सदस्य बाळकृष्ण कोमावर व नामदेव मडावी यांनी पत्रकार परिषदेत केला.
संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी संस्था हडपण्याच्या दृष्टीने संस्थेत नातेवाईकांना सभासदत्व देण्याचा प्रयत्न केला होता. प्राथमिक सभासदांच्या खोट्या सह्या करून धमार्दाय आयुक्तांकडे बदल अर्ज सदर केला होता. मात्र संस्थेच्या प्राथमिक सभासदांनी आक्षेप घेऊन सदर बदल अर्ज मंजूर होऊ दिला नाही. त्यामुळे पिंक्लेश्वर राठोड हे संस्थेचे सदस्य अथवा सचिव नसून त्यांचा संस्थेशी कसलाही संबंध नसताना त्यांच्याकडून होणारी अनुदानाची उचल ही शासनाची फसवणूक आहे.
शासनाने पिंक्लेश्वर राठोड यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून हडप केलेली रक्कम वसूल करावी व दोषी अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करावी, अशी मागणी बाळकृष्ण कोमावर व नामदेव मडावी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)