निप्पॉन डेन्ड्रोच्या जागेवर नवीन प्रकल्पाचे संकेत
By admin | Published: October 5, 2015 01:28 AM2015-10-05T01:28:38+5:302015-10-05T01:28:38+5:30
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात भद्रावती व वरोरा तालुक्यातील विविध समस्यांना घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर ...
मुख्यमंत्र्यांशी चर्चा : वरोरा व भद्रावती तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची भेट
भद्रावती : केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात भद्रावती व वरोरा तालुक्यातील विविध समस्यांना घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पाच्या जागेवर नवीन प्रकल्प उभारण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.
बरांज (मो) येथील एम्टा कोल माईन्स मागील पाच महिन्यापासून बंद असून तेथील प्रकल्पग्रस्त कामगारांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. तेथील समस्या तत्काळ मार्गी लावाव्या, अशा सुचना मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिल्या. भद्रावती-वरोरा तालुक्यातील सिंगल फेजींग बंद करण्यासाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन तेथील सिंगल फेजिंग बंद करून सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावे, याबाबतही चर्चा झाली. त्यामध्ये भद्रावती-वरोरा तालुक्याती शेतीसाठी दररोज दिवसाचा थ्रीफेज वीज पुरवठा करण्याच्या सूचना मंत्रिमहोदयांनी दिल्या. भद्रावती येथील निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी परत करण्यासाठी किंवा तेथील शेतकऱ्यांना नव्या दराने जमिनीचा मोबदला देण्यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उद्योग मंत्रालयाचे मुख्य सचिव गिगलानी उपस्थित होते.
सोलर एनर्जीला लागणाऱ्या पॅनल्सच्या प्रकल्पाविषयी दोन हजार एकर जमीन अधिग्रहण केली जाणार असल्याची माहिती याप्रसंगी प्राप्त झाली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले. जागेची पाहणी सुद्धा झाले असे चर्चेला उपस्थित असलेल्यांनी सांगितले. भद्रावती-वरोरा तालुक्यातील समस्यांच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री बावनकुळे, कृषीमंत्री एकनाथ खडसे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,तसेच विभागाचे सचिव उपस्थित होते. चर्चेला केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हा महासचिव राहूल सराफ, विजय राऊत, भद्रावती-वरोरा विद्युत वितरण ग्राहक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, ओम मांडवकर, प्रवीण ठेंगणे, मंगेश लोणारकर, विनोद मत्ते, संजय ढाकणे उपस्थित होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लागण्याची आशा आहे. (तालुका प्रतिनिधी)