स्वातंत्र्यपूर्व काळापासून 'ती' गावे पक्क्या रस्त्याविना; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:33 PM2024-10-16T14:33:14+5:302024-10-16T14:33:42+5:30
गंगासागर हेटी-लोहारडोंगरी : खडतर वाटेत वन्यप्राण्यांचीही भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : नागभीड तालुक्यातील जंगलव्याप्त भागात असलेल्या गंगासागर हेटी-लोहारडोंगरी गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्का रस्ताच नाही. परिणामी, नागरिक तळोधी (बा) महामार्गाचा वापर करतात. परंतु, या रस्त्याची अवस्था दयनीय आणि बिकट झाली आहे. तसेच हिंस्त्र पशुंचा नेहमीच वावर राहतो. त्यामुळे या रस्त्याने मार्गक्रमण करणे धोक्याचे झाले आहे. मात्र, याकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
लोहारडोंगरी हे छोटेशे आदिवासीबहुल खेडेगाव आहे. या गावाच्या आसपास किटाळी, नवेगाव हे खेडेगाव आहेत. येथील नागरिक मोलमजुरी करून पोटाचा उदरनिर्वाह करतात. येथील लोकांना तळोधी बाजारपेठ अगदी जवळ पडत असल्याने त्यांना लोहारडोंगरी- गंगासागर हेटी या एकमेव मार्गाने यावे लागते. येथील मुले प्राथमिक शिक्षणासाठी गंगासागर हेटी तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गंगासागर हेटी, वाढोणा, तळोधी येथे जातात. परंतु, हा मार्ग कमकुवत व कच्च्या रस्त्याचा आहे. तसेच वाघ व इतर हिस्त्र प्राण्यांची दहशत असते. त्यामुळे या रस्त्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
झाडे-झुडपांनी वेढला रस्ता
लोहारडोंगरी - गंगासागर हेटी गावाच्या या रस्त्यावर दुतर्फा झाडे- झुडपे वाढली आहे. तसेच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
साधे दुचाकीवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. जंगलालगत रस्त्यावर हिंस्त्र श्वापदांचा वावर आहे. त्यामुळे बरेचदा दुर्घटना घडल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्ता एकच, गावे वेगवेगळ्या क्षेत्रात
गंगासागर हेटी-लोहारडोंगरी हा रस्ता जवळपास चार किमी अंतराचा आहे. मात्र लोहारडोंगरी, किटाळी, नवेगाव ही गावे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात येतात.
तर गंगासागर हेटी हे गाव चिमूर विधानसभा क्षेत्रात येते. वास्तविक पाहता ब्रह्मपुरी क्षेत्रातील मार्ग डांबरीकरणाचा झाला आहे. मात्र, काही अंतराचा मार्ग अत्यंत दयनीय स्थितीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
"गंगासागर हेटी-लोहारडोंगरी रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या जंगलव्याप्त गावाच्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही लोकप्रतिनिधींकडून डोळेझाक होत आहे. रस्त्याच्या या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन तत्काळ हा प्रश्न निकाली काढावा."
- वासुदेव गायकवाड, माजी सरपंच ग्रा. पं. गंगासागर हेटी