तीन प्रभागातील निवडणुकीत पडणार पैशाचा पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 03:34 PM2022-01-12T15:34:12+5:302022-01-12T16:10:28+5:30
सिंदेवाहीतील शिल्लक राहिलेल्या तीन प्रभागात १४ उमेदवार सध्या उभे आहेत. प्रभागातील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असल्याने कॉंग्रेस, भाजप, आम आदमी पार्टी, अपक्ष आपले भवितव्य अजमावत आहे.
राकेश बोरकुंडावार
चंद्रपूर : एक बालगीत सगळ्यांनी बालपणात म्हटले असेल ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, असाच पैशाचा पाऊस सिंदेवाहीतील शिल्लक राहिलेल्या तीन प्रभागाच्या निवडणुकीत होणार अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. पण त्या गीताप्रमाणे पैसा खोटा होईल काय, असाही प्रश्न मतदार करीत आहेत.
सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत मनी पॉवर म्हणजे धनशक्तीचा जोरदार वापर झाला, असे जाहीरपणे मतदारच बोलू लागले आहेत. शिल्लक असलेल्या तीन प्रभागाची लढत प्रतिष्ठा पणाला लावणारी होईल. या लढतीत कॉंग्रेस, भाजप या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढाई होईल, असा कयास लावला जात आहे.
गत दोन महिन्यापासून पुढारी किती लाखाची आर्थिक उलाढाल केली त्यांचे गणित मतदार मांडत आहेत. प्रभागात मोठ्या प्रमाणात मद्यपार्ट्या व पैशाचा पाऊस पडण्याची मोठी शक्यता आहे कारण एकमेकांविरूद्ध असलेले उमेदवार तगडे आहेत. त्याच कारणाने जनमानसात होणाऱ्या चर्चेत दम दिसून येतो. आतापासून आर्थिक बलाढ्य असणाऱ्या उमेदवारांची धास्ती इतर पक्षांच्या उमेदवारांनी घेतली आहे.
भूतकाळात झालेल्या निवडणुकीचा इतिहास साक्ष देत आहे. आर्थिक बळावर निवडणूक जिंकता येते, तसेच मतदारांनी मनात आणले तर, ती निवडणूक पराभवाचा सामना बघायलाही लावू शकते. पराभवाचा धोका होऊ शकतो यासाठी काही उमेदवार आपल्या बाजूने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले गेले आहेत. विरोधकांची मते खाण्याचा प्रयोग सामान्य झाला आहे, तीन प्रभागात १४ उमेदवार सध्या उभे आहेत. प्रभागातील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असल्याने कॉंग्रेस, भाजप, आम आदमी पार्टी, अपक्ष आपले भवितव्य अजमावत आहे.
चार प्रभागासाठी १० उमेदवार रिंगणात
जिवती : २१ तारखेला झालेल्या मतदानानंतर शांत झालेले सारेच पक्ष उर्वरीत चार प्रभागांसाठी परत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. जिवती नगरपंचायत निवडणुकीत उर्वरित चार प्रभागांसाठी १० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात तीन उमेदवार काँग्रेस, तीन उमेदवार गोंडवाना गणतंत्र पार्टी, तर शिवसेना, बीजेपी यांचा प्रत्येकी एक तर एक अपक्ष असे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणुकीसंदर्भातील थंड झालेल्या चर्चांना आता पुन्हा सुरू झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण महिलांकरिता राखीव आहे. त्यामध्ये भाजपकडून लताबाई राठोड, विजयालक्ष्मी जवालसिंग राठोड (घड्याळ), प्रभाग क्रमांक १३ सर्वसाधारणसाठी रमेश पुरी, प्रशांत राठोड, अशफाक रसूल शेख, जमालुद्दीन अहमद शेख, प्रभाग क्रमांक १४ सर्वसाधारणमध्ये ममता नंदजी जाधव, दिवाकर वेट्टी, प्रभाग क्रमांक १५ सर्वसाधारण महिलासाठी जयश्री गोतावळे, शेसूबाई हरी राठोड असे १० उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. चारही प्रभागांसाठी मंगळवारी मतदान तर बुधवारी (दि. १९) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना संकट असतानाही उमेदवारांनी आपला प्रचार जोमाने करणे सुरू केले आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे निवडणुकीनंतरच कळणार आहे. मात्र, सध्यातरी वातावरण चांगलेच तापले आहे.