सिंदेवाही तालुक्यात २४५२ रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:21+5:302021-06-01T04:21:21+5:30
सिंदेवाही : तालुक्यात आतापर्यंत दोन हजार ४५२ रुग्णांनी कोरोनाला हरवून या आजारावर मात केली, तर २९ जणांना आपला जीव ...
सिंदेवाही : तालुक्यात आतापर्यंत दोन हजार ४५२ रुग्णांनी कोरोनाला हरवून या आजारावर मात केली, तर २९ जणांना आपला जीव गमवावा लागला. सध्या तालुक्यात केवळ २७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.
तालुक्यात या एक वर्षात एकूण रुग्णसंख्या २ हजार ५०८ होती. आता मात्र रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत तालुक्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. तालुका प्रशासनासमोर कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान होते. वेळोवेळी आलेल्या निर्देशानुसार स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. सिंदेवाही येथील समाज कल्याणच्या वसतिगृहात ७०, तर ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर येथे ३० बेडची व्यवस्था केली होती. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. कोविड सेंटरला भेट देत ऑक्सिजन सिलिंडर रुग्णवाहिका सेवा सुरू केली. तहसीलदार गणेश जगदाळे, नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, पोलीस निरीक्षक योगेश घारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मानकर तसेच पोलीस, तहसील, नगर पंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कोरोना रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळेच तालुक्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे दिसते.