सिंदेवाहीचा पशुवैद्यकीय दवाखाना दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:17+5:302021-06-05T04:21:17+5:30
सिंदेवाही : तालुक्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागअंतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला श्रेणी-१चा दर्जा असूनही दुर्लक्षित आहे. नागरिकांना नेहमीच हा दवाखाना कुलूपबंद ...
सिंदेवाही : तालुक्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागअंतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला श्रेणी-१चा दर्जा असूनही दुर्लक्षित आहे. नागरिकांना नेहमीच हा दवाखाना कुलूपबंद आढळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
एका शासकीय इमारतीत १९६२पासून गुरांचा दवाखाना आहे. प्रथम श्रेणीचा दर्जा प्राप्त आहे. दवाखाना मोडकळीस आलेला आहे. शेतकरी, नागरिक आपली जनावरे गुरांच्या दवाखान्यात आणत असतात. परंतु दवाखाना कधी बंद, कधी चालू असल्याने अनेकांना जनावरांना घेऊन परत जावे लागते. पाळीव प्राणी, मुक्या जनावरांना रोगाची लागण झाली असता वेळेवर उपचार मिळत नाहीत. पशु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर गुरांचा दवाखाना सुरू आहे. विशेष म्हणजे दवाखान्यात पशुचिकित्सक फिरते वाहन उपलब्ध आहे. परंतु आश्चर्य असे की, त्या गाडीला एकच कंत्राटी कर्मचारी चालक आहे. तोच प्राण्यांवर उपचारही करीत असल्याची शोकांतिका आहे. तालुक्यातील प्रथम श्रेणी दर्जा असलेल्या पशु वैद्यकीय दवाखान्यात अधिकारीच नसल्याने दुर्लक्षित आहे. त्यामुळे पशुपालकांची गैरसोय होत आहे.